>> राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; एका डॉक्टरलाही सेवावाढ
11 निवृत्त मुख्याध्यापकांना एका वर्षाची सेवावाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सरकारी विद्यालयांमध्ये पात्र मुख्याध्यापकांची कमतरता असल्याने सरकारने सरकारी विद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालये मिळून 11 निवृत्त मुख्याध्यापकांना सेवेत एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य खात्यातील एक डॉक्टर संतोष नाईक यांनाही मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला.
मुदतवाढ देण्यात आलेल्या मुख्याध्यापकांमध्ये अनासियो सेबेस्तिना अंतोनिया सेलेना डायस, प्राचार्य साईरश बी. देसाई, आना ग्राका डिसा, उत्कर्षा उदय नाईक, मृत्युंजय अंगडी, जेसी ज्युली पेरेरा, आंतोनियो पावलो ब्रागांझा, स्नेहा श्रीकांत गावकर, लीरा ए.व्ही.ई. सौझा, वत्सला गंगाधरन विश्वंभरम व अमिता पंढरीनाथ शेट तळावलीकर यांचा समावेश आहे.
आरोग्य खात्यातील शल्यचिकित्सक डॉ. संतोष नाईक यांना दोन वर्षांची सेवावाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गोमेकॉतील वेलनेस फॉरेव्हरच्या 14 कोटींच्या बिलाला कार्योत्तर मंजुरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला. दरम्यान, पशुखाद्य प्रकल्पासाठीची जमीन सहकार खात्याकडून पशुसंवर्धन खात्याकडे हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.