108 अर्ज ग्राह्य; आज अंतिम चित्र स्पष्ट

0
16

फोंडा आणि साखळी नगरपालिका निवडणूक रणसंग्राम; अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांना आज दुपारपर्यंतची मुदत

फोंडा आणि साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल एकूण 118 अर्जांची काल छाननी करण्यात आली. छाननीनंतर फोंडा पालिका निवडणुकीसाठी 52 उमेदवारी अर्ज आणि साखळी पालिका निवडणुकीसाठी 56 उमेदवारी अर्ज असे मिळून एकूण 108 उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरले. काही जणांनी दुहेरी उमेदवारी अर्ज दाखल केले होते; ते छाननीत आपोआप बाद ठरले. गुरुवार दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली असून, त्यानंतर दोन्ही पालिकांतील निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

फोंडा आणि साखळी या दोन्ही नगरपालिकांच्या 5 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी काल करण्यात आली. छाननीत फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 52 उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरले. फोंडा पालिकेच्या 4 प्रभागांत प्रत्येकी 2 अर्ज, 5 प्रभागांत प्रत्येकी 3 अर्ज आणि 6 प्रभागांत 4 आणि जास्त उमेदवारी अर्ज ग्राह्य झाले आहेत. प्रभाग 6 मध्ये सर्वाधिक 6 अर्ज दाखल झाले आहेत.

भाजप समर्थित गटामध्ये राज्याचे कृषी मंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या कट्टर समर्थकांचा भरणा दिसून येत आहे. नगराध्यक्ष रितेश नाईक आणि रॉय नाईक यांच्याबरोबर मंत्री नाईक यांचे निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रभाग 1 मधून रॉय नाईक निवडणूक रिंगणात असून, या प्रभागात एकूण 5 उमेदवार आहेत, तर प्रभाग 5 मधून रितेश नाईक निवडणूक रिंगणात असून या प्रभागात एकूण 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी 56 उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरले आहेत. प्रभाग 1 आणि 2 मधून सर्वाधिक 8 उमेदवारी अर्ज आहेत. प्रभाग 3 आणि 11 मध्ये थेट लढत होणार आहे, तर पालिकेच्या 4 प्रभांगांमध्ये प्रत्येकी 6 उमेदवारी अर्ज स्वीकृत झाले आहेत.

साखळीचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव
साखळी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंबंधीचा आदेश काल जारी केला.