106 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर

0
23

>> ‘ओआरएस’चे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण

भारत सरकारने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला काल पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी केंद्र सरकारने एकूण 106 जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले. त्यामध्ये 6 मान्यवरांना पद्मविभूषण, 9 मान्यवरांना पद्मभूषण, तर 91 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘ओआरएस’चे निर्माते दिलीप महालनाबिस, प्रसिद्ध आर्किटेक्ट बालकृष्ण दोशी आणि सपाचे नेते मुलायम सिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला आहे. तसेच तबलावादक झाकिर हुसेन, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा आणि विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल एनआरआय श्रीनिवास वर्धन यांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे.

औषधनिर्माण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय एकूण 9 मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यात प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्यासह एस. एल. भैरप्पा (साहित्य व शिक्षण), कुमार मंगलम बिर्ला (व्यापार व उद्योग), दीपक धर (विज्ञान व अभियांत्रिकी), वाणी जयराम (कला), स्वामी चिन्ना जियार (अध्यात्म), कपिल कपूर (साहित्य व शिक्षण), सुधा मूर्ती (समाजसेवा) आणि कमलेश पटेल (अध्यात्म) यांचा समावेश आहे.

पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये परशुराम कोमाजी खुणे, प्रभाकर मांडे, भिकू इदाते, रमेश पतंगे, रतन चंद्राकर, हिराबाई लोबी, मुनीश्वर चंदेर दावार, नेकराम शर्मा, धनिराम टोटो, बी. रामकृष्ण रेड्डी, अजय कुमार मंडावी, कपिल देव प्रसाद यांच्यासह 91 जणांचा समावेश आहे.