राज्य सरकार राज्यातील सुमारे 1000 भंगारअड्ड्यांना (स्क्रॅपयार्ड्स) स्वतंत्र जागा उपलब्ध करण्यावर विचारविनिमय करीत आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल दिली.
मोन्सेरात यांनी पर्वरी येथील मंत्रालयात एका बैठकीत राज्यातील भंगारअड्ड्यांच्या विषयावर चर्चा केली. या बैठकीनंतर बोलताना मोन्सेरात म्हणाले की, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुमारे 269 भंगारअड्ड्यांची नोंद आहे, तर सुमारे 800 भंगारअड्डे बेकायदेशीरपणे कार्यरत आहेत.
कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून भंगारअड्ड्यांसाठी वेगळी जागा शोधली जाणार असून, ती 2 महिन्यांच्या आत भंगारअड्ड्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जीआयडीसीकडे सुपूर्द केली जाईल. त्यासाठी जीआयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती मोन्सेरात यांनी दिली.
यापुढे राज्यातील सर्व भंगारअड्ड्यांना सरकारकडे नोंदणी करावी लागेल. नोंदणी न करणारे भंगारअड्डे बंद केले जाणार आहेत, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.