100 दिवसांत गोवा क्षयरोग मुक्त होणार

0
1

>> आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती

आरोग्य खात्याने क्षयरोग मुक्ती गोव्याचे उद्दिष्ट ठेवले असून 100 दिवसांच्या आत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत क्ष-किरण (एक्स-रे) तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. या एक्स-रे मशिन्सबरोबरच अत्याधुनिक मशिन्सही खरेदी केली जाणार असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

वरील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी येत्या 1 ते 12 जानेवारी या दरम्यान क्षयरोगाच्या नजरेने धोक्याच्या असलेल्या विभागांत विशेष मोहिमा राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रेरणादायी अशा युवकांसह अन्य व्यक्तींची मदत घेऊन जागृती घडवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे, असे राणे यांनी स्पष्ट केले. दर आठवड्याने एकदा या मोहिमांचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी परिणामकारक असे व्हिडिओ समाजमाध्यमांवरून व्हायरल केले जाणार असून त्यासाठी खास करून युवा वर्गातील इन्फ्लुएन्सर्सची मदत घेतली जाणार आहे. महिला व बालविकास खाते, आरोग्य ह्या खात्यांना या मोहिमेशी जोडले जाणार असून ही मोहीम तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार असल्याचे राणे म्हणाले.

याप्रश्नी काल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याबरोबर आभासी (व्हुर्च्युअल) बैठक झाली. विविध राज्यांतील आरोग्यमंत्र्यांबरोबर झालेले जे. पी. नड्डा यांच्या या आभासी बैठकीच्यावेळी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी क्षयरोग निर्मूलनासंबंधीच्या या बैठकीत विविध महत्त्वाच्या अशा सूचना केल्या. नड्डा यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आमदार तसेच पंचायतींची भूमिका महत्त्वाची ठरेल असे स्पष्ट केले.