>> वाढलेल्या वजनामुळे विनेश फोगाट ठरली अपात्र; ऑलिम्पिकच्या कठोर नियमांमुळे 140 कोटी भारतीयांचा अपेक्षाभंग
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे चौथे पदक निश्चित झाले, असे वाटत असतानाच काल भारतीयांचा मोठा अपेक्षाभंग झाला. कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगाट हिला काल अपात्र ठरवण्यात आले.
या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे 50 किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. निर्धारित श्रेणीत विनेशचे वजन जास्त होते. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. विनेशचे 50 किलो वजन मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम जास्त आहे. त्यामुळे ती अपात्र ठरली. स्पर्धेच्या नियमांनुसार, विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही. या स्पर्धेत विनेशने ज्या प्रकारे खेळ केला होता, ते पाहता ती सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार होती; मात्र अपात्र ठरवल्याने तिच्यासह सर्व भारतीयांना मोठा धक्का बसला. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
मग प्रशिक्षक, आहारतज्ज्ञ, फिजिओ काय करत होते?
भारत सरकारने विनेशला प्रशिक्षक, आहार तज्ज्ञ आणि फिजिओ प्रदान केले आहेत. हे सर्वजण तिच्याबरोबर पॅरिसमध्ये आहेत. विनेशचे वजन वाढलेले असताना ते काय करत होते?, असा सवाल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी केला.
वजन घटवण्याचे प्रयत्न अपुरे
नियमानुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. 50 किलो वजनी गटात विनेशचे वजन मंगळवारी रात्री त्यापेक्षा अंदाजे 2 किलो जास्त होते. ती रात्रभर झोपली नव्हती आणि निकष पूर्ण करण्यासाठी तिने जॉगिंगपासून स्किपिंग आणि सायकलिंगपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले; पण ते अपुरे पडल्याने विनेशला अपात्र ठरवले.
विनेश तू भारताचा गौरव : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करत विशेन फोगाटला धीर देण्याचा प्रयत्न केला. विनेश तू भारताचा गौरव आहेस. शिवाय तू प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तुझे अपात्र ठरवले जाणे हे वेदनादायी आहे. ही बातमी ऐकून मला जे दुख: होतं आहे, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आव्हान स्वीकारणे हा नेहमीच तुझा स्वभाव राहिला असून तू नक्कीच पुनरागमन करशील, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही सर्व तुझ्या पाठिशी आहोत, असे मोदींनी म्हटले आहे.
अपात्रतेच्या निर्णयाविरुद्ध क्रीडा लवादाकडे तक्रार
दरम्यान, या अपात्रतेच्या निर्णयाविरुद्ध विनेश फोगाट हिने काल सायंकाळी क्रीडा लवादा (सीएसए) कडे अपील केले असून, लवादाकडे संयुक्त रौप्यपदक द्यावे, अशी मागणी केली आहे. या अपीलावर लवाद गुरुवारी निर्णय देणार आहे.