10 वर्षांपूर्वी घोटाळ्यांची चर्चा; आता प्रकल्पांची : पंतप्रधान मोदी

0
12

पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील ‘शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन

मुंबईला रायगडशी जोडणाऱ्या ‘शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ या सागरी सेतूचे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या अटल सेतूबाबत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या काळात बांधलेल्या वांद्रे-वरळी सी लिंकशी याची तुलना केली. तसेच, काँग्रेसवरही टीकास्र डागले. मागच्या 10 वर्षांत भारत बदलला आहे. 10 वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्यांची चर्चा होत होती; मात्र आता कोट्यवधींच्या प्रकल्पांची चर्चा होत आहे, असे मोदी म्हणाले.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू खुला झाल्याने मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर आता दोन तासांवरून 20 मिनिटांवर आले आहे. तसेच नवी मुंबईसह पुणे आणि गोवा जवळ येणार आहे. मुंबईतील अटल सेतू हा देशातील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू असून, त्याची लांबी 21 किलोमीटर एवढी आहे.

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी मुंबईत विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. पंतप्रधानांच्या हस्ते राज्यातील आठ प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचे नवे पर्व ठरणाऱ्या मुंबई-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्ताने नवी मुंबई विमानतळ मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.

मोदी सरकारने जी हमी दिली, तीच हमी महाराष्ट्र सरकार पुढे नेत आहे. आमच्यासाठी लोकार्पण, शिलान्यास हा एका दिवसाचा कार्यक्रम नसतो. आम्ही लोकांसाठी काम करतो, असे मोदी म्हणाले.

मागील अनेक दिवसांपासून या अटल सेतूची चर्चा होत आहे. आता या अटल सेतूची विशालता पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले आहेत. हा सागरी सेतू बनवण्यासाठी जपानने जे सहकार्य केले, त्यासाठी त्यांचे आभार मानतो. 10 वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा होत होती. आता हजारो कोटींच्या प्रकल्पांची चर्चा होत आहे, असे मोदी यांनी सांगत काँग्रेसवर टीकास्त्र डागले.

अटल सेतू हा वांद्रे-वरळी सी लिंकपेक्षा जास्तपटीने आधुनिक आहे. तेव्हाच्या सरकारला हा सेतू बनवण्यासाठी 10 वर्ष लागली होती; पण अवघ्या काही वर्षांत अटल सेतू मुंबईकरांच्या सेवेत आला. ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून देशावर राज्य केले, त्यांची दृष्टी चांगली नव्हती. त्यामुळे त्यांना देशात विकास करता आला नाही, असे मोदी म्हणाले.