10 दिवसांनंतर पावसाची उसंत

0
54

मागील दहा दिवस राज्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने काल थोडी उसंत घेतली. तसेच राज्यातील नागरिकांना 25 ते 30 दिवसानंतर सूर्यदर्शन घडले. पावसाची रिपरिप थांबल्याने मागील चोवीस तासांत राज्यात 0.86 इंंच पावसाची नोंद झाली.

राज्यात मागील दहा दिवसात 28.47 इंच एवढ्या पावसाची नोंद झाली. राज्यातील सर्व प्रमुख धरणे भरली आहेत. तसेच राज्यातील सांगे, केपे, वाळपई आणि मडगाव या केंद्रांनी पावसाच्या इंचाचे शतक ओलांडले आहे. राज्यातील सांगे येथे 112.55 इंच, वाळपई येथे 106.56 इंच, केपे येथे 106.87 इंच, मडगाव येथे 100.87 इंच पावसाची नोंद झाली, तर फोंडा येथे 98.96 इंच पावसाची नोंद झाली आहे. पाऊस आता इंचाच्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, आत्तापर्यंत राज्यात 96.54 इंच पावसाची नोंद झाली आहे. मोसमी पाऊस उशिराने दाखल होऊन सुध्दा राज्यातील पावसाचे प्रमाण 31.3 टक्के जास्त आहे.

राज्यात चोवीस तासांत सांगे येथे सर्वांधिक 1.88 इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे 1.58 इंच, मडगाव येथे 1 इंच आणि साखळी येथे 0.85 इंच पावसाची नोंद झाली. राज्यातील इतर भागातील पावसाचे प्रमाण कमी होते.
राज्यात गेल्या पंधरा दिवसात झाडांच्या पडझडीच्या 960 घटनांची नोंद झाली असून, त्यात 78 लाख 69 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे. तसेच मागील चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या आणखी 44 घटनांची नोंद झाली, त्यात सुमारे 1 लाख 95 रुपयांचे नुकसान झाले आहे.