1 कोटींच्या फसवणूक प्रकरणी एकाला अटक

0
3

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे 1.02 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने के. कृष्ण मूर्ती (63, रा. शिमोगा कर्नाटक) नामक व्यक्तीला अटक केली असून, त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील न्यायालयाने काल दिला.
एका अनोळखी व्यक्तीने तक्रारदाराला 15 मे 2025 पूर्वी एएसके स्मार्ट प्रॉस्पेक्ट वायफाय या योजनेखाली जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळे मोबाईल आणि वॉट्सॲप क्रमांकांच्या माध्यमातून विविध बँक खात्यात मोठी रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडले.

या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर गुन्हा विभागाने चौकशीला सुरुवात केली. सायबर गुन्हा विभागाच्या एका पथकाने शिमोगा कर्नाटक येथे जाऊन संशयित आरोपी के. कृष्ण मूर्ती याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये संशयित आरोपीच्या बँक खात्यात पाच लाख रुपये जमा झाल्याचे आढळून आले असून त्याने मिळालेली रक्कम सहकाऱ्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केली आहे. संशयिताने बाप्पा मशीन प्रा. लिमिटेड नावाने एक बँक खाते सुरू केले आहे. सदर बँक खाते तीन राज्यांतील एकूण 6.5 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या पाच सायबर गुन्हा प्रकरणामध्ये गुंतलेले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.