0.001 टक्का निष्काळजीपणाही परीक्षेच्या पावित्र्यासाठी धोकादायक

0
8

>> ‘नीट’प्रकरणी सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले मत

नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. विद्यार्थ्यांमधील रोष वाढल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. 12 जूनपासून सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि परीक्षा प्रक्रिया राबविणाऱ्या एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीला खडेबोल सुनावले. परीक्षा प्रक्रियेतील 0.001 टक्का निष्काळजीपणाही पूर्ण परीक्षा प्रक्रियेला धक्का देण्यासाठी पुरेसा आहे. थोडासाही निष्काळजीपणा संपूर्ण परीक्षा प्रक्रियेच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

या परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी जीवतोड मेहनत करतात. अतिशय अवघड मानल्या जाणाऱ्या या परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळण्याचा प्रयत्न होत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाहीत, असेही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एनटीएला या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत.