‘ॲलर्जी’ विधानावरून राजकारण तापले

0
3

>> आमदार विजय सरदेसाईंच्या विधानाचा मुख्यमंत्र्यांकडून खरपूस समाचार; मगो नेते सुदिन ढवळीकर यांचेही टीकास्त्र

‘गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेविषयी ॲलर्जी होती. आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही गोव्याच्या अस्मितेविषयी ॲलर्जी आहे’, असे खळबळजनक विधान गोवा फॉरवर्डचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी काल केले. त्या वक्तव्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जोरदार समाचार घेतला. ह्या वक्तव्यातून सरदेसाईंनी केवळ भाऊसाहेब बांदोडकरांचाच नव्हे, तर गोव्याचाही अपमान केला आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय मगोचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी देखील विजय सरदेसाईंवर टीकास्त्र डागले.

भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेविषयी ॲलर्जी होती. आणि म्हणूनच गोव्याला जनमत कौलाला सामोरे जावे लागले, असे वादग्रस्त वक्तव्य विजय सरदेसाई यांनी बुधवारी केले. हे वक्तव्य करतानाच राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही गोव्याच्या अस्मितेविषयी ॲलर्जी असल्याचा आरोप व टीका सरदेसाई यांनी केली होती. सावंत यांना गोव्याच्या अस्मितेविषयी ॲलर्जी आहे आणि म्हणूनच त्यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना यंदापासून जनमत कौल दिन सरकारतर्फे साजरा करण्यात येणार असल्याचे आश्वासन देऊनही हा दिवस साजरा केला नसल्याचा आरोप सरदेसाईंनी केला होता.

ह्या वादग्रस्त विधानामुळे दुखावलेल्या व घायाळ झालेल्या मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’वरून (पूर्वीचे ट्विटर) विजय सरदेसाई यांना प्रत्युत्तर देताना त्यांना चांगलेच झोडपून काढले. भाऊसाहेबांना गोव्याच्या अस्मितेविषयी ॲलर्जी होती असे विधान करून सरदेसाई यांनी केवळ चुकीची व दिशाभूल करणारी माहितीच दिलेली नसून, वरील विधानाद्वारे त्यांनी भाऊसाहेबांचा घोर अपमानही केलेला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

भाऊसाहेब हे एक उतुंग असे व्यक्तिमत्त्व होते. आणि ते सदैव गोव्याच्या विकासासाठी अथकपणे झटले. खरी समस्या आहे ती विजय सरदेसाई यांची. त्यांचा ‘इगो’ म्हणजेच अहंभाव हा फुगत चाललेला आहे. तेच खरे ‘नीज गोंयकार’ आहेत हे भासवण्यासाठी ते अशा प्रकारची बेताल वक्तव्ये करीत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.

हा गोव्याचाही अपमान : मुख्यमंत्री
विजय सरदेसाई यांनी भाऊसाहेबांविषयी केलेल्या अपमानकारक अशा वक्तव्याचा आपण तीव्र निषेध करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्या विधानाद्वारे सरदेसाई यांनी केवळ भाऊसाहेबांचाच नव्हे, तर गोव्याचाही अपमान केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

सुभाष वेलिंगकरही सरदेसाईंवर बरसले
गोमंतकाचे पहिले मुख्यमंत्री, ज्यांना गोमंतकाचे ‘भाग्यविधाते’ असे नामाभिधान गोव्याच्या जनतेनेच दिले आहे, असे स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्याच्या अस्मितेचा तिटकारा होता, असा शोध लावलेल्या राजकारण्यांच्या विकृतीचा मी तीव्र धिःकार करतो, अशी टीका सुभाष वेलिंगकर यांनी केली आहे.