>> आतापर्यंत केवळ 4 हजार जणांकडूनच नोंदणी
राज्य सरकारने ॲप्रेंटिसशिप योजनेखाली 10 हजार जणांना प्रशिक्षणार्थी म्हणून सरकारी कार्यालये व खासगी कंपन्यांत सामावून घेण्याची तयारी ठेवली आहे; मात्र या योजनेखाली नोकरीसाठी राष्ट्रीय पोर्टलवर आत्तापर्यंत केवळ 4 हजार युवकांनी नोंदणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील युवा वर्गाने या ॲप्रेंटिसशिप योजनेखाली त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचे संचालक एस. एस. गावकर यांनी काल पत्रकार परिषदेत केले.
या योजनेखाली प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना 8 ते 13 हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाणार आहे. राज्य सरकारच्या विविध खात्यात सुमारे 5 हजार आणि खासगी क्षेत्रात 5 हजार जणांना सामावून घेतले जाणार आहे, असेही गावकर यांनी सांगितले.
या योजनेत सामावून घेण्यात 1 हजार जणांना येत्या 15 जुलै रोजी जागतिक कौशल्य दिनी नियुक्ती पत्रांचे वितरण केले जाणार आहे. राज्यातील 11 ठिकाणी एकाच वेळी हा कार्यक्रम होणार असून, मुख्य कार्यक्रम ताळगाव येथील सामाजिक सभागृहात होणार आहे, असे गावकर यांनी सांगितले.
या योजनेखाली मायक्रो बायोलॉजिस्ट, इलेक्ट्रिशियन, टर्नर, फिटर, प्लंबर, डेटा एंट्री ऑपरेटर, कॉम्प्युटर ऑपरेटर, कारकून, ड्रायव्हर, क्लिनर, केमिस्ट, बॅक ऑफिस असिस्टंट, फ्रंट ऑफिस असिस्टंट, अकाऊंटंट अशा विविध जागा सरकारी खात्यांमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. खासगी कंपन्यांतील जागांची यादी देखील उपलब्ध केली आहे, असे एस. एस. गावकर यांनी सांगितले.