८ आमदारांविरोधातील अपात्रता याचिका त्वरित निकाली काढा

0
9

>> गिरीश चोडणकर यांचा सभापतींसमोर अर्ज

कॉंग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ८ आमदारांविरोधातील अपात्रता याचिका त्वरित निकाली काढण्यासाठी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर अर्ज दाखल केला आहे.

गिरीश चोडणकर यांनी ८ आमदारांच्या विरोधात गेल्या महिन्यात ११ नोव्हेंबर रोजी अपात्रता याचिका दाखल केली आहे. अपात्रता याचिका दाखल करून २० दिवसांचा काळ पूर्ण झाला, तरी या प्रकरणातील पुढील कार्यवाही किंवा सुनावणीच्या तारखेबाबत कोणतीही सूचना मिळालेली नाही, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

दुसर्‍या बाजूला कॉंग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या या आठ आमदारांविरुद्ध याचिका दाखल केली जाणार असून, त्याबाबत कॉंग्रेसचे आमदार ऍड. कार्लुस फेरेरा यांनी काल माहिती दिली. ८ आमदारांच्या विरोधात येत्या २-३ दिवसांत अपात्रता याचिका सभापतींसमोर दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती ऍड. कार्लुस फेरेरा यांनी दिली.