८० हजार कोटींच्या संरक्षण प्रकल्पांना मान्यता

0
61

केंद्र सरकारने काल तब्बल ८०,००० कोटी रुपयांच्या संरक्षण विषयक प्रकल्पांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार पूर्णतः भारतीय बनावटीच्या सहा पाणबुड्या बांधल्या जाणार आहेत. तसेच आठ हजार इस्त्रायली क्षेपणास्त्रे व १२ अद्ययावत डॉर्नियर टेहळणी विमाने खरेदी केली जाणार आहेत.संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या संरक्षणविषयक संपादन मंडळाच्या बैठकीत या विषयी निर्णय घेण्यात आले. दोन तास चाललेल्या या बैठकीत संरक्षण सचिव, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, डीआरडीओ प्रमुख तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बहुतेक निर्णय नौदलासाठीच्या खरेदी व्यवहारासाठी घेण्यात आले. त्यापैकी सर्वात मोठा वाटा होता तो पूर्णतः भारतीय बनावटीने ५० हजार कोटी रुपये खर्चून सहा पाणबुड्या बांधण्याविषयीचा. विदेशातून खरेदी करण्याऐवजी भारतातच या पाणबुड्या बांधाव्यात असा निर्णय झाला.
या निर्णयाव्यतिरिक्त रणगाड्यांविरोधी ३२०० कोटी रुपये किंमतीची ८५३६ इस्रायली क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्याकडून १८५० कोटी रुपयांची १२ डॉर्नियर टेहळणी विमाने खरेदी केली जाणार आहेत.