>> मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याकडून स्पष्ट
मगोला जर या निवडणुकीत ७ ते ८ जागा मिळाल्या, तर पक्षाचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर हे मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना स्पष्ट केले.
मुख्यमंत्री पदावर दावा करण्यासाठी पक्षाला किमान ७ ते ८ जागा जिंकाव्या लागतील आणि तेवढ्या किंवा त्यापेक्षाही जास्त जागा मगोला मिळू शकतात, असा विश्वास देखील दीपक ढवळीकर यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस व भाजप या पक्षांमध्ये जसे मुख्यमंत्री पदासाठीचे दावेदार आहेत, तसेच मगोमध्ये सुदिन ढवळीकर हे मुख्यमंत्री पदासाठीचे दावेदार आहेत, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
आमच्या पाठिंब्याने जर एखादे सरकार सत्तेवर येणार असेल, तर ती आमच्यासाठी अभिमानाची बाब असेल. अशा प्रसंगी आमच्या पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांना मुख्यमंत्री पद मिळावे, असा दावा मगो पक्ष निश्चितच करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या कोणताही पक्ष आपणाला अमूक जागा मिळतील व आपलाच पक्ष सरकार स्थापन करेल, असा दावा करू शकतो. मात्र कोण किती पाण्यात आहे ते लवकरच म्हणजे १० मार्च रोजी स्पष्ट होणार आहे, असेही ते म्हणाले. लोकांनी योग्य विचार करूनच मतदान केलेले आहे. याविषयी आपणाला शंका नसल्याचेही ते पुढे म्हणाले.