>> कालवी-हळदोणा पुलावरील घटना
कालवी-हळदोणा येथील पुलावरून काल दुपारी ३.३० च्या सुमारास ७ वर्षीय मुलासह पित्याने नदीत उडी घेतली. या घटनेनंतर पोलिसांनी नदीत शोधकार्य सुरू केले होते; मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, रामतले-हळदोणा येथील ४८ वर्षीय विजय विष्णू गावकर यांनी काल दुपारी आपल्या ७ वर्षांच्या मुलासह कालवी-हळदोणा येथील पुलावरून नदीत उडी घेतली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती म्हापसा पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर, उपनिरीक्षक बाबलो परब, सहाय्यक उपनिरीक्षक रिकी फर्नांडिस, तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधकार्य सुरू केले. तसेच स्थानिकांच्या मदतीने नदीत बोटींच्या माध्यमातून शोध घेण्यात आला; परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नाही. पोलीस व जवानांकडून आणि गावातील लोकांकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य चालूच होते. विजय गावकर यांना आणखी एक १० वर्षांचा आणखी एक मुलगा आहे.