७ वर्षांनंतर मडगाव पालिकेत भाजपची सत्ता

0
11

>> नगराध्यक्षपदी दामोदर शिरोडकर विराजमान; गोवा फॉरवर्डचा बहिष्कार

मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक दामोदर शिरोडकर यांची बिनविरोध निवड झाली. २००५ ते आतापर्यंत भाजपला मडगाव पालिकेत सत्ता मिळवता आली नव्हती. अखेर १७ वर्षांनंतर पालिकेत भाजपची सत्ता आली असून, नगराध्यक्षपदी भाजपचा नगरसेवक विराजमान झाला आहे. दिगंबर कामत यांनी भाजप सोडल्यानंतर आतापर्यंत मडगाव पालिकेत भाजपला सत्ता मिळवता आली नव्हती. मात्र कामत पुन्हा भाजपमध्ये परतल्याने हे यश प्राप्त झाले आहे.

काल पालिका सभागृहात नगराध्यक्ष निवडणुकीसाठी विशेष बैठक झाली. यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून वरिष्ठ अधिकारी अतिरिक्त वित्त सचिव विकास गावणेकर उपस्थित होते. त्यांनी एकच उमेदवारी अर्ज आल्याचे सांगून दामोदर शिरोडकर यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी भाजपचे १६ नगरसेवक उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष घन:श्याम शिरोडकर व गोवा फॉरवर्डच्या सर्व नगरसेवकांनी निवड प्रक्रियेचा निषेध म्हणून त्यावर बहिष्कार टाकला.
गेल्या महिन्यांत आवश्यक संख्याबळ असूनही भाजपप्रणित उमेदवार दामोदर शिरोडकर यांचा पराभव झाला होता. त्यावेळी भाजपची पाच मते फुटली होती. त्यामुळे सरकारने पालिका कायद्यात बदल करून हात उंचावून मतदान करण्याची अधिसूचना काढल्याने ही निवड सोपी झाली. आमदार दिगंबर कामत गटाचा नगरसेवक नगराध्यक्ष बनला आहे.

नगराध्यक्षपदी निवड जाहीर होताच आमदार दिगंबर कामत यांनी पालिकेत येऊन दामोदर शिरोडकर यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी पिंपळकट्ट्यावर जावून श्री दामबाबाची भेट घेतली व तेथे प्रार्थना केली.

मडगावच्या प्रत्येक विकासकामात आपले प्राधान्य असेल. सुरुवातीस आपण मुख्याधिकार्‍यांमार्फत सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्या कामाचा अहवाल घेईन, असे दामोदर शिरोडकर यांनी सांगितले. दिगंबर कामत व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे त्यांनी आभार मानले. सायंकाळी नगरसेवकांसमवेत त्यांनी सोनसडा कचरा प्रकल्पाला भेट देत पाहणी केली.

विद्यमान पालिका मंडळ कार्यकाळातील तिसरे नगराध्यक्ष

दामोदर शिरोडकर हे विद्यमान पालिका मंडळाच्या कार्यकाळातील तिसरे नगराध्यक्ष आहेत. सुरुवातीस मडगाव मॉडेल आणि फातोर्डा फॉरवर्ड यांच्यातील करारानुसार लिंडन पेरेरा हे १५ महिने नगराध्यक्ष होते. ती मुदत संपल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर मधल्या काळातील नाट्यमय घडामोडींनंतर घन:श्याम शिरोडकर हे नगराध्यक्ष बनले. त्यांच्यावर एका दिवसांतच अविश्‍वासाचा ठराव आणला गेला होता. त्यानंतर ते पायउतार झाले होते.