६६ आरोपींपैकी २४ दोषी, ३६ दोषमुक्त

0
76

>>गुजरातमधील गुलबर्ग सोसायटी प्रकरणी

 

सन २००२ मध्ये गुजरातमधील अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीत झालेल्या भीषण जळीतकांड प्रकरणी विशेष न्यायालयाने काल ६६ पैकी २४ जणांना दोषी धरले, तर ३६ जणांची निर्दोष मुक्तता केली. गुलबर्ग सोसायटीवरील हल्ला हा पूर्वनियोजित नव्हता, तर उत्स्फूर्त होता असेही निवाड्यात न्यायालयाने म्हटले आहे. दोषींना येत्या सहा जून रोजी सजा सुनावली जाईल.
ज्या २४ जणांना न्यायालयाने दोषी धरले आहे, त्यापैकी ११ जणांना हत्येच्या, तर इतर १३ जणांना इतर गुन्ह्यांखाली दोषी धरण्यात आले आहे. दोषींमध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते अतुल वैद्य यांचाही समावेश आहे. न्यायालयात निवाड्यावेळी आरोपींना पाठिंबा देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.
ज्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, त्यात मेघानीनगरचे पोलीस निरीक्षक के. जी. इर्डा यांचा समावेश आहे. निष्काळजीपणे परिस्थिती हाताळल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. गुलबर्ग सोसायटीच्या रहिवाशांचा जीव वाचवण्यासाठी पोलीस निरीक्षकाची उपस्थिती अत्यावश्यक असताना ते तेथून पळून गेल्याचा व पुरावे नष्ट केल्याचा गुन्हाही त्यांच्याविरोधात नोंदवण्यात आला होता. भाजपचे स्थानिक नगरसेवक बिपीन पटेल व कॉंग्रेसचे माजी नगरसेवक मेघसिंग चौधरी यांचीही मुक्तता करण्यात आली आहे.
गुलबर्ग सोसायटी प्रकरणी सुनावणी सात वर्षे वेगवेगळ्या चार न्यायाधीशांसमोर चालली. विशेष न्यायमूर्ती पी. बी. देसाई यांनी काल निवाडा दिला. ही सुनावणी सप्टेंबर २०१५ मध्येच पूर्ण झाली होती, परंतु तेव्हा निवाडा देण्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.
गुजरात दंगलीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाद्वारे ज्या नऊ प्रकरणांचा तपास केला जात आहे, त्यापैकी गुलबर्ग सोसायटीचे प्रकरण हे आठवे आहे.
प्रदीर्घ सुनावणी दरम्यान ६६ आरोपींपैकी पाच जणांचे निधन झाले. ३३८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. विद्यमान पंतप्रधान व गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाही त्यात समावेश होता. सुमारे ३० बंगले आणि १० अपार्टमेंट असलेल्या गुलबर्ग सोसायटीवर गोध्रा येथे कारसेवकांसह रेलगाडी जाळण्यात आल्याच्या दुसर्‍या दिवशी हल्ला झाला होता. त्यात कॉंग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्यासह ६९ जणांना जाळून मारण्यात आले होते. त्यापैकी ३९ मृतदेह सापडले होते, तर ३० जणांची बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली होती. सात वर्षांनंतर त्यांना मृत घोषित केले गेले. मृत घोषित केलेल्यांपैकी मुजफ्फर शेख हा २००८ साली जिवंत आढळून आला होता.