५ दिवसांनंतर नवे कोरोना रुग्ण ३ हजारांच्या खाली

0
24

>> नवीन २१७४ कोरोनाबाधितांसह ६ बळींची नोंद; राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २१ हजार ९५७

राज्यात मोठ्या प्रमाणात आढळून येणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येत थोडीशी घट झाली असून, गेल्या चोवीस तासांत नवीन २१७४ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. पाच दिवसांनंतर कोरोना रुग्णसंख्या ३ हजारांच्या खाली आहे. तसेच आणखी ६ कोरोना बळींची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासांत नवीन ५२३६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील २१७४ नमुने बाधित आढळून आले. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४१.५२ टक्के एवढे आहे, तर राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २१ हजार ९५७ एवढी झाली आहे. इस्पितळात दाखल होणार्‍या कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ झाली आहे.
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी १५९२ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.०० टक्के एवढे खाली आले आहे.

राजभवन पर्यटक, नागरिकांसाठी बंद
राजभवनातील अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने राजभवन येत्या २३ जानेवारीपर्यंत एक आठवडा नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. राजभवनाच्या मुख्य फाटकावर पत्रे, फाईल्स आणि इतर पत्रव्यवहार स्वीकारला जाणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

बायोमेट्रिक हजेरीतून सूट
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी कर्मचार्‍यांना येत्या ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बायोमेट्रिक हजेरीतून सूट देण्यात आली आहे. तसेच दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली आहे. जे कर्मचारी कार्यालयात येत नाहीत, त्यांनी टेलिफोन किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून उपलब्ध असले पाहिजे. घरातून काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी गरजेच्या वेळी कार्यालयात आले पाहिजे, असेही आदेशात म्हटले आहे.