राज्यातील कोरोना संशयित ५५ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. पुणे येथे पाठविण्यात आलेल्या सर्व ४८ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आलेला आहे. गोमेकॉच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या ७ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. १७ नमुन्यांचा तपासणी झालेली नाही अशी माहिती काल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
गोमेकॉने राज्यातील ४८ संशयित कोरोना रुग्णांचे गेल्या आठवड्यात पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवले होते असे मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.
गोव्यात आत्तापर्यंत कोरोनाचे ५ रुग्ण सापडले असून सध्या त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार चालू आहेत. त्या पाचही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यापेैकी दोघे रुग्ण आता कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने करण्यात आलेल्या तासणीत त्यांना कोरोना नसल्याचे दिसून आले असल्याचे श्री. राणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आज गुरूवारी परत एकदा त्यांचे नमुने गोळा करून तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी दिली. उद्याच्या चाचणीत जर परत एकदा त्यांना कोरोना नसल्याचे आढळून आले तर त्यांना इस्पितळातून हलवून विलगीकरण खोलीत ठेवण्यात येणार आहे.
५५ संशयित कोरोना रुग्णांचे अहवाल नकारात्मक आल्यामुळे आरोग्य खात्यावरील ताण कमी झाला असल्याचे राणे यांनी सांगितले.