पेडणे पोलिसांनी दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा मानशीवाडा – कोरगाव येथे केलेल्या कारवाईत एका नाजयेरियन नागरिकाकडून सुमारे ५१ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करुन त्याला अटक केली. इफेचुकवू डेव्हिड मादुकवे असे या नाजयेरियनचे नाव असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणी पेडण्याचे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी माहिती दिली. त्यानुसार सदर नायजेरियन नागरीक मानशीवाडा-कोरगाव येथे अंमली पदार्थ व्यवहारात गुंतला होता. तेथील तो राहत असलेल्या भाड्याच्या घरावर धाड घातली असता सोफाखाली दडवून ठेवण्यात आलेले ३०९ ग्रॅम कोकेन व २०० ग्रॅम एमडीएम हे ५० लाख ९० हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ सापडले. पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली संजीत कांदोळकर, विवेक कानोलकर, अनंत भाईडकर, रुपेश कोरगावकर, विष्ण्ाू गाड, गुरुदास मांद्रेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी नायजेरियन नागरिकाविरुद्ध भादंसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे.