५० जागांसाठी १९२ उमेदवार रिंगणात

0
126

दक्षिण गोव्यातून ९९, तर उत्तरेतून ९३ उमेदवार रिंगणात
येत्या १८ रोजी राज्यातील दोन जिल्हा पंचायतीसाठी होणार्‍या निवडणुकीसांठी अर्ज भरलेल्या उमेदवारांपैकी काल ६३ जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता दोन्ही जिल्हा पंचायतींच्या मिळून ५० जागांसाठी एकूण १९२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता उत्तर गोवा जिल्ह्यात एकूण ९३ उमेदवार अंतिम रिंगणात आहेत. त्यात ६० पुरुष व ३३ महिला उमेदवार आहेत. दक्षिण गोव्यात एकूण ९९ उमेदवार राहिले असून त्यापैकी ६५ पुरुष व ६४ महिला उमेदवार आहेत.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी काल उत्तर गोव्यातून २९ व दक्षिण गोव्यातून ३४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यावेळी प्रथमच या निवडणुका पक्षीय पातळीवर होत आहेत. भाजप, मगो, गोवा विकास पक्ष यांची युती आहे. तर कॉंग्रेसने अपक्षांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. जिल्हा पंचायतींना विशेष कोणतेही अधिकार दिलेले नसले तरी आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी राजकीय पक्षांनी जोर लावला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठीच्या खर्चाची मर्यादा ५ लाख रुपये केली आहे, असे असले तरी या निवडणुकीसाठीही बर्‍याच दिवसांपासून उमेदवारांचे समर्थकांनी मेजवान्यांचेही सत्र सुरू केले आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोगाने निरीक्षकांचीही नियुक्ती केली आहे. बारावीची परीक्षा चालू असल्याने उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना निवडणुकीचे काम दिलेले नाही. परंतु विद्यालयातील शिक्षकांबरोबरच अन्य कर्मचार्‍यांनाही निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम झाल्याचे अनेक शिक्षकांनी सांगितले.
अर्ज मागे घेणार्‍यांची तालुकानिहाय संख्या
तिसवाडी- ९ सांगे- एकही नाही
पेडणे- ३ फोंडा- ११ मुरगाव- ९ सासष्टी- ११
डिचोली- ५ काणकोण- २
सत्तरी- ४ बार्देश- ८
धारबांदोडा- १ केपे- २