>> केंद्रीय मंत्री जावडेकर यांची माहिती
देशात कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने येत्या १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनावरील लस घेता येणार असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल ही माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी जावडेकर म्हणाले. कोरोनावरील लशीचा देशात पुरेसा साठा आहे. त्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे यावेळी जावडेकर म्हणाले. सरकारने मंजुरी दिलेल्या कोव्हॅक्सीन व कोव्हिशील्ड या दोन्ही लस प्रभावी असून येत्या १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना आता लस घेता येणार आहे. यासाठी पात्र नागरिकांनी लगेचच लसीकरणासाठी नोंदणी करून लस घ्यावी, असे आवाहन प्रकाश जावडेकर यांनी केले.
४.८५ कोटी लसीकरण
आतापर्यंत ४ कोटी ८५ लाख नागरिकांना कोरोनाचे लसीकरण झाले आहे. ४ कोटीहून अधिक नागरिकांना एक डोस तर ८५ लाखांहून अधिक नागरिकांना दोन्ही डोस मिळाले असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.
लसीकरणात पहिल्या डोसनंतर ४ ते ६ आठवड्यात दुसरा डोस घेण्याच्या आधी सूचना होत्या. पण आता कोव्हिशील्डच्या बाबतीत ४ ते ८ आठवड्यांत दुसरा डोस घेता येईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
दीड वर्षे तरी मास्क वापरा
मास्क अजून जवळपास दीड वर्षे तरी लावावा लागेल असे जावडेकर यावेळी म्हणाले. याचसोबत सामाजिक अंतराचे भान राखावे तसेच हात स्वच्छ धुवावेच लागतील. पण लसीकरण केल्यामुळे आपल्याला अधिक सुरक्षा मिळेल. त्यामुळे लॉकडाउनची गरज पडणार नाही, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.