४० मतदारसंघांतून ३०१ उमेदवार रिंगणात

0
20

>> ३१ उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

>> बहुतेक ठिकाणी बहुरंगी लढत अपेक्षित

गोवा विधानसभेच्या येत्या १४ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी ४० मतदारसंघात ३०१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी ३१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

पणजी, मांद्रे, सांगे, काणकोण, प्रियोळ, फोंडा, कुंकळ्ळी या मतदारसंघांत भाजप उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. अनेक राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात असल्याने बहुतेक मतदारसंघांत तिरंगी, चौरंगी व बहुरंगी लढती अपेक्षित आहेत.

शिवोलीत सर्वाधिक उमेदवार
शिवोली मतदारसंघात सर्वाधिक १३ उमेदवार, तर, मडगाव, डिचोली, पर्वरी, बाणावली व सांताक्रुझ मतदारसंघात प्रत्येकी ५ उमेदवार आहेत. मांद्रेत – ९, पेडणे -९, थिवी -७, म्हापसा – ८, साळगाव -६, हळदोणा – ६, पणजी – ७, ताळगाव – ८, सांत आंद्रे – ७, कुंभारजुवा – ७, मये – ९, साखळी -१२, पर्ये – ७, वाळपई – ८, प्रियोळ – ८, फोंडा – ७, शिरोडा – ८, मडकई – ८ , मुरगाव – ८, वास्को – ९, दाबोळी – ७, कुठ्ठाळी – ९, नुवे – ७, कुडतरी – ८, फातोर्डा – ६, नावेली – ९, कुंकळ्ळी – १०, वेळ्ळी -६, केपे – ७, कुडचडे ६, सावर्डे – ७, सांगे – ८ आणि काणकोण ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

पाच दाम्पत्यांना उमेदवारी
विधानसभा निवडणुकीत पाच दाम्पत्ये आहेत. त्यामध्ये भाजपच्या उमेदवारीवर विश्‍वजित राणे-दिव्या राणे आणि बाबूश मोन्सेरात – जेनिफर मोन्सेरात, कॉंग्रेसच्या उमेदवारीवर मायकल लोबो- डिलायला लोबो, तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवारीवर किरण कांदोळकर – कविता कांदोळकर निवडणूक लढवीत आहेत. कवळेकर दाम्पत्यही निवडणूक रिंगणात आहे. मात्र त्यातील भाजपच्या उमेदवारीवर चंद्रकांत कवळेकर आणि अपक्ष उमेदवार म्हणून सावित्री कवळेकर निवडणूक रिंगणात आहेत. मगोपचे सुदिन व दीपक ढवळीकर हे बंधू निवडणूक रिंगणात आहेत. आलेमाव बाप-लेकही निवडणूक रिंगणात आहे. चर्चिल आलेमाव बाणावलीतून तर त्यांची कन्या वालंका नावेली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.

विद्यमान २२ आमदार
पुन्हा रिंगणात

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत साखळी मतदारसंघ, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत मडगाव मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर आणि मनोहर आजगांवकर, सभापती राजेश पाटणेकर निवडणूक रिंगणात आहेत. विद्यमान २२ आमदार पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कॉंग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे, भाजपचे आमदार पांडुरंग मडकईकर निवडणूक रिंगणात उतरले नाहीत. आमदार मडकईकर यांच्या पत्नी जेनिता मडकईकर निवडणूक रिंगणात आहे. ३१ माजी आमदार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर मांद्रे मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.