४०७ बाधितांसह ४ जणांचा बळी

0
264

>> चाचण्या कमी केल्याने रुग्णसंख्या कमी

राज्यात नवे ४०७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. तसेच, कोरोना पॉझिटिव्ह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेतील कोरोना नमुन्यांच्या तपासणी संख्या कमी असल्याने नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २४,५९२ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ५१७३ एवढी झाली आहे.

आणखी ४ मृत्यू
केरी पेडणे येथील ७५ वर्षांचा पुरुष रुग्ण, हडफडे-नागवा येथील ७३ वर्षांचा पुरुष रुग्ण, आसगाव बार्देश येथील ७२ वर्षांचा पुरुष रुग्ण आणि साखळी येथील ८८ वर्षांच्या महिलेचे काल गोमेकॉमध्ये निधन झाले.

बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत १३३६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील एक तृतीयांश म्हणजेच ४०७ स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर, २३४ स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. आरोग्य खात्याने ११५९ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. जीएमसीच्या आयझोलेशनमध्ये १७८ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

५५३ कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह ५५३ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १९,१२९ एवढी झाली आहे. २०० रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला असून होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या ९५२५ एवढी झाली आहे.

सप्टेंबरच्या १३ दिवसांत ९८ बळी
राज्यात सप्टेंबर २०२० या महिन्यात कोरोना बळीच्या प्रमाणात वाढ झाली असून या महिन्याच्या पहिल्या तेरा दिवसात आत्तापर्यंत ९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील कोरोना बळीची एकूण संख्या ३०० च्या जवळ येऊन ठेपली आहेत.
राज्यातील कोरोना बळींचे मृत्यूसत्र रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश प्राप्त झालेले नाही. कोरोना रुग्णांना इतर आजार असल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे.
राज्यात सप्टेंबर महिन्यात ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची तसेच, कोरोना बळीची संख्याही वाढत चालली आहे. ऑगस्ट महिन्यात १४७ जणांचा बळी गेला होता.

राज्यात दिवशी सरासरी सात ते आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. राज्यात ८ सप्टेंबरला ११, २ आणि १२ सप्टेंबरला प्रत्येकी १० रुग्णांचा बळी गेला आहे. सौम्य कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण होम आयसोेलेशनचा पर्याय स्वीकारत आहेत. उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमधील १६४ तर, दक्षिण गोव्यातील कोविड सेंटरमधील ४८२ खाटा रिक्त आहेत.

पेडण्यात १० वा बळी
केरी पेडणे येथील ७३ वर्षीय नागरिकाचा काल कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे पेडणे तालुक्यात आत्तापर्यंत १० जणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. सदर व्यक्तीवर गोमेकॉत उपचार चालू होते. त्यांच्यावर केरीतील स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.