– प्रा. भानुदास खैरकर, पर्वरी
निसर्गात अनेक आकाराचे व प्रकारांचे वृक्ष आढळतात. त्यांचे मानवी जीवनात मोठे योगदान आहे. धार्मिक पूजाविधी, शरीर रोगावरील गुणकारी औषधे, तसेच राहती घरे आणि विविध रीतीच्या लाकडी वस्तू बनवण्यास त्यांचा उपयोग होतो. या सर्व वृक्षांमध्ये सागवान हा वृक्ष सर्वाधिक उपयुक्त व सहायक समजला जातो. या वृक्षाला वाळवी किंवा कसर कधी लागत नाही. तो कधी खराब वा टाकाऊ ठरत नाही. प्रदीर्घ काळ टिकून राहतो, म्हणून तक्षक वर्ग या वृक्षाला सर्वाधिक पसंती देतात.
अशा या विशाल सागवान लाकडाला प्रत्यक्ष पाहण्याचा योग आल्यास तो आनंद वेगळाच म्हणता येईल! हे महाकाय आकाराचे लांबलचक अवाढव्य लाकूड पाहायला मिळते ते बल्लारपूरला! हे शहर चंद्रपूर जिल्ह्यात असून ते नागपूरपासून १७५ कि. मी. आणि वर्ध्यावरून १०० कि. मी. वर आहे. तसे हे ऐतिहासिक स्थळ आहे. येथे चौदाव्या शतकात खांडक्या बल्लाळशा नावाचा गोंड राजा होऊन गेला. त्याच्या राजधानीचे हे ठिकाण होते. येथे त्याचा किल्ला भग्नावस्थेत असून या किल्ल्याजवळून बारमाही वर्धा नदी वाहत असते. या शहरात या गोंड राजाची समाधी अजूनही सुस्थितीत आढळते. अलीकडे हे शहर औद्योगिक शहर म्हणून विकसित होत आहे. येथे १९०४ मध्ये सुरू करण्यात आलेली कोळसा खाण असून आता तिला ११० वर्षे झाली आहेत. ही खाण भूगर्भात सुमारे आठशे फूट खोल खणण्यात आलेली असून येथील कोळसा उत्तम दर्जाचा समजला जातो. येथेच दिल्लीच्या थापर समूहाची बल्लारशा पेपर मिल असून येथील उत्पादित कागद विविधोपयोगी व उत्तम प्रतीचा समजला जातो. त्याला सर्वत्र मागणी असते. येथे महाराष्ट्र राज्याचे वन विकास महामंडळ आहे. शासकीय काष्ठ भांडार असून येथे वर्षातून दोन तीन वेळा उत्कृष्ट सागवान लाकडाचा लिलाव होतो व त्यासाठी संपूर्ण भारतातून तसेच विदेशातून मोठमोठे टिम्बर मर्चंट खरेदीला हजेरी लावतात. ही औद्योगिक नगरी असल्याने भारताच्या विविध राज्यांतून आलेले कर्मचारी रहिवासी म्हणून गुण्यागोविंदाने राहतात. म्हणूनच आचार्य विनोबा भावे यांनी त्यांच्या पदयत्त्रेच्या गमनपर्वात या बल्लारपूरला ‘छोटा भारत’ संबोधले ते सार्थ आहे. येथे शिखांचा गुरूद्वारा आहे. इथूनच डॉ. प्रकाश आमटे यांच्या प्रसिद्ध भामरागड – हेमलकसा या आदिवासी प्रकल्पाकडे जाता येते. अलीकडे या शहराला तालुक्याचा दर्जाही लाभला आहे.
या बल्लारपुरात मागील साठ – सत्तर वर्षांपासून शासकीय काष्ठ भांडार असून तेथे वर उल्लेखित विशाल सागवान लाकूड ठेवण्यात आले आहे. ते पाहण्यास पर्यटक, इतिहासप्रेमी व सागवान अभ्यासक आवर्जून भेट देतात. हे लाकूड प्रेक्षणीय आहे. याला आता ३३२ वर्षांचा कालावधी लोटलेला असून ते तेव्हाच्या दक्षिण चंद्रपूर व आताच्या गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीच्या घनदाट जंगलातून एक ट्रॅक्टर, दोन हत्ती व पंचवीस – तीस कर्मचारी यांच्या मदतीने जून १९५८ मध्ये येथे आणण्यात आले आहे. त्या घटनेला पन्नास वर्षे होऊन गेल्याने सुवर्णजयंती साजरी करण्यात आली. हे साग लाकूड तीन ते चार फूट रुंदीचे आणि बावन्न फूट म्हणजे अंदाजे पंधरा – सोळा मीटर लांबीचे अवाढव्य आहे. याचा हा लांबलचक आकार लक्षात घेऊन त्याला ‘बिग वूड’ म्हणजे विशाल लाकूड संबोधले जाते. याची अनेक वैशिष्ट्ये असून या लाकडाच्या एका टोकावर हळूवार हाताने टक टक असा आवाज केला असताना त्याच्या दुसर्या लांबच्या टोकावर हा टकटक आवाज स्पष्टपणे ऐकू येतो.
वन विभागाच्या अभ्यासावरून हे लाकूड इसवी सन १६८३ मधील असल्याचे सांगतात. येथे अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांची नोंद करण्यात आली आहे. उदाहरणार्थ इसवी सन १६८३ मध्ये दक्षिणेत मोगलांचे आक्रमण झाले. सन १७०७ मध्ये ८९ वर्षांच्या औरंगजेबाचा मृत्यू झाला. सन १७०८ मध्ये शिखांचे दहावे धर्मगुरू गोविंदसिंह यांचा नांदेड मुक्कामी घातपाती मृत्यू ओढवला. सन १७१८ साली महाराष्ट्रातून मराठ्यांनी दिल्लीवर चढाई केली. सन १७८० मध्ये महाराजा रणजितसिंह यांनी पंजाबमध्ये शिखांचे राज्य स्थापन केले. सन १८१८ साली मराठ्यांचा पराभव केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने १८४४ साली भारतात पहिले सागवान रोपवन तयार करण्यात पुढाकार घेतला. १८६४ मध्ये ब्रॉडिस या ब्रिटीश अधिकार्याची त्या रोपवनाचे पहिले महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. १८७८ साली डेहराडून येथे वनविषयक शाळेची स्थापना झाली. येथे १९०६ साली वनसंशोधन संस्था स्थापन करण्यात आली. शिवाय त्यानंतरच्या अनेक घटनांची दखल येथे घेण्यात आलेली दिसते, ती पर्यटक व इतिहासप्रेमींना मार्गदर्शक व प्रेरक आहे.पण यातील काही नोंदी अभ्यासकांत संभ्रम निर्माण करू शकतात, उदा. इ. स. १७५७ साली पानिपतची पहिली लढाई झाली हे बरोबर नसून १५२६ मध्ये बाबर व लोधी यांच्यात झालेली लढाई ही पानपतची पहिली लढाई आहे. १७५७ मध्ये झालेली लढाई ही प्लासीची असून इथून ब्रिटिशांची सत्ता देशात विस्तार पावत गेली. १९३९ मध्ये भारत छोडो आंदोलन छेडण्यात आले हेही चूक असून ते १९४२ मध्ये झाले. मोगलांचे आक्रमण दक्षिण भारतात १७ व्या नव्हे, तर चौदाव्या शतकात झाले होते. असो.
पस्तीस वर्षांपूर्वी या विशाल लाकडाचा राहिलेला एक खंडित भाग आलापल्लीतून आणून याच्याशेजारी ठेवण्यात आला आहे, तोही लक्षवेधक आहे. हा दुसरा भाग तेरा फूट लांब व दीड मीटर रूंद आहे. या दोन्ही लाकडांना मध्यभागी भेगा जाऊ नयेत यासाठी लोखंडी पट्ट्यांनी आवरण देण्यात आले आहे. ही दोन्ही लाकडे या परिसरात राम आणि लक्ष्मण म्हणून संबोधण्यात येतात. आलापल्लीच्या जंगलातील हे विशाल सागवान झाड तेव्हा झालेल्या जोरदार वादळवार्यामुळे कोलमडून पडले आणि त्याच वर्षीच्या जून महिन्यात ते येथे आणण्यात आले. या विलक्षण घटनेला २००८ मध्ये पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या सुवर्णजयंतीचे निमित्त साधून या शासकीय आगारात मोठे दिमाखदार भवन उभारण्यात आले. आता तेथे एक अस्वल, एक बिबट्या आणि दोन वाघ भुसा भरून ठेवण्यात आले आहेत. तसेच सागवान लाकडाचे इतर विविध आकारांचे काही नमुनेही दिसून येतात. मात्र, या भवनातील कार्यरत कर्मचारीवर्ग पुरेसा स्वागतशील, सहकार्योत्सुक व संवेदनक्षम वाटत नाही. त्यांचा तुसडेपणा पर्यटकाला निराश – नाराज करू शकतो. पण सागवान प्रेमी पर्यटकांनी या स्थळाला अवश्य भेट द्यायला काही हरकत नसावी.