२ ऑक्टोबरला सर्व कॅसिनोही बंद ठेवावेत : कॉंग्रेस

0
82

मद्यालयांबरोबरच मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंसह सर्व कॅसिनोही गांधी जयंतीदिनी बंद ठेवावेत, अशी मागणी काल कॉंग्रेसने केली. काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार तथा पक्षाचे प्रवक्ते आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले की, सरकारने गांधी जयंतीदिनी मांडवीतील कॅसिनोंवर राज्यातील सर्व कॅसिनो बंद ठेवावेत. पर्रीकर सरकार जर राष्ट्रपित्याचा मान राखत असेल तर ते राज्यातील सर्व कॅसिनो बंद ठेवतील, असे रेजिनाल्ड यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘निर्मल भारत नितळ गोवा’ योजनेत पर्रीकर यांनी विरोधकांना सहभागी करून घेतले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच एका बाजूने ‘निर्मल भारत नितळ गोवा’ असा नारा देणारे पर्रीकर दुसर्‍या बाजूने कॅसिनोंमुळे मांडवीत जे प्रदूषण होत आहे त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे रेजिनाल्ड म्हणाले.
विरोधी पक्षनेते असताना मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंच्या विरोधात आवाज उठवणार्‍या पर्रीकर यांनी सत्ता हातात येताच तरंगत्या कॅसिनोंचा विस्तार केल्याचे ते म्हणाले. मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंतून जो महसूल मिळेल तो महसूल आपण वृद्धाश्रम व अनाथाश्रमांसाठी देणार असल्याचे पर्रीकर यांनी विधानसभेत सांगितले होते. मात्र, अजून कॅसिनोंतून मिळणारे पैसे त्यांनी वृद्धाश्रम व अनाथाश्रमांना दिले नसल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेस सरकार सत्तेवर असताना मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंना परवाने देताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला होता. मात्र, सत्तेवर आल्यानंतर त्यांनी परवाने रद्द करायचे दूरच, उलट बहुमजली कॅसिनो बोट आणल्याचे रेजिनाल्ड म्हणाले.
जुगार आयुक्ताची त्यानी अद्याप नियुक्ती न केल्याने त्याचा फायदा कॅसिनोंना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.