२६ जानेवारीपर्यंत शाळा बंद राहणार

0
21

>> राज्य कृती दलाची शिफारस; लवकरच आदेश जारी होणार

राज्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यावर विचार केला जात आहे. तसेच, राज्यातील शाळांचे वर्ग येत्या २६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कृती दलाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. राज्य सरकारकडून संचारबंदी आणि विद्यालयाचे वर्ग बंद ठेवण्याबाबत लवकरच आदेश जारी केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्य कृती दलाच्या बैठकीला आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचीही उपस्थिती होती. राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर नागरिक आणि पर्यटकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजनांवर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला आहे, अशी माहिती राणे यांनी दिली.

राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी काही शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. त्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करणे, विद्यालयांचे सातवी ते बारावी आणि महाविद्यालयांचे वर्ग येत्या २६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. शेखर साळकर यांनी कृती दलाच्या बैठकीनंतर बोलताना दिली.

सभागृहातील कार्यक्रमांवर काही निर्बंध घातले जाणार आहेत. तसेच लग्न समारंभावर काही निर्बंध घातले जाणार आहेत. विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयातून विद्यार्थ्यांना कोरोना लस देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात येण्याची गरज नाही. बंदच्या काळात विद्यालयांचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेतले जाणार आहेत. परीक्षा ऑफलाईन घेतली जाणार आहे, असे डॉ. साळकर यांनी सांगितले.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी, इस्पितळात दाखल होणार्‍या बाधितांच्या संख्येचे प्रमाण कमी आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सुद्धा नियंत्रणात आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे आठवड्याचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना आखण्याची गरज आहे.

  • डॉ. शेखर साळकर,
    सदस्य, कृती दल.