महासंचालकांची ग्वाही
२६/११च्या अतिरेकी हल्ल्याने भारतीय तटरक्षक दल आणखी सतर्क आणि सक्षम बनले आहे. ही सक्षमता पाच किंवा दहा दिवसांसाठी नसून वर्षाच्या एकूण ३६५ दिवसांसाठी असल्याचे तटरक्षक दलाचे महासंचालक अनुराग थापलियालाल यांनी गोवा शिपयार्डमध्ये गस्तीनौकेच्या जलवतरण कार्यक्र’ावेळी संबोधित करताना सांगितले.तटरक्षक दलासाठीच्या सर्वांत मोठ्या गस्तीनौकेचे जलावतरण गोवा शिपयार्डमध्ये तटरक्षिकेच्या अध्यक्षा रचना थापलियालाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयजी एस. पी. बसरा, फ्लॅग ऑफिसर गोवा नेवल एविलशन बी. एस. प्रहार डी. आयजी. मनोज बाडकर, कमांडिंग ऑफिसर, सिनियर ऑफीसर, भारतीय नौदल व तटरक्षक दल, तसेच गोवा राज्याचे वीजमंत्री मिलिंद नाईक, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, गोवा शिपयार्डचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेटक्टर रिअर ऍडमिरल शेखर मित्तल आदि मान्यवर उपस्थित होते.
तटरक्षक दलासाठी बांधण्यात आलेल्या १२१८ नौकेची लांबी १०५ मीटर असून, रुंदी १३.६ मीटर तसेच वजन २३५० टन इतके आहे. या नौकेत १७ कमांडिंग अधिकारी, १६ मुख्य अधिकारी तसेच इतर अधिकारी ९८ व खलाशी धरून एकूण १३३ अधिकारी वर्ग कार्यरत असेल. ह्या जहाजाची वेगमर्यादा लक्षात घेऊन कमी वजनाच्या वस्तू वापरून हे जहाज तयार केले आहे. शोध व सुटका मोहीम, वापरता येणार असल्याची माहिती यावेळी तटरक्षक दलाचे महासंचालक श्री. थापलियालाल यांनी सांगितले. याव्यतिरिक्त या नौकेवर हेलिकॉप्टर उतरविण्याचीही सोय आहे, तसेच नौकेला दोन इंजीन असून ३० मीमीची एक तोफ तर १२.७ मी.मी.च्या छोट्या तोफा यावर बसविण्यात आल्या आहेत. भारतीय तटरक्षक दलासाठी बांधण्यात आलेल्या या १०५ मिटर लांबीची ही पहीलीच अत्याधुनिक नौका असून ही गस्तीनौका भारतीय तटरक्षक दलाच्या भारतीय आर्थिक विभागाच्या रक्षणासाठी अति महत्त्वाची असून आणखी सहा गस्ती जहाज भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्डतर्फे बांधण्यात येणार असल्याचे श्री. थापलियालाल यांनी पुढे बोलताना सांगून यावेळी त्यांनी २६/११ मुंबई अतिरेकी हल्ला तसेच ९/११ अमेरिका अतिरेकी हल्ल्यांना उजाळा दिला व या हल्ल्यात मृत झालेल्यांना एक मिनिटांची स्तब्धता बाळगून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.सुरुवातीला गोवा शिपयार्डचे चेअरमन रिअर ऍडमिरल श्री. मित्तल यांनी स्वागतपर भाषण केले. तद्नंतर जहाज अनावरणाच्या कार्यक्रमानंतर गोवा शिपयार्डच्या आठ कर्मचारी वर्गाचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.