>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह
राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २५ हजार ०७१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.६८ टक्के एवढे आहे. राज्यात काल नवे ५१९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना बळींची संख्या ३८६ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ०७१ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ५६१४ एवढी झाली आहे.
बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत १९८१ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आत्तापर्यंत २ लाख ४६ हजार १७० नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
कोरोना सौम्य लक्षणे असलेल्या नवीन ३२५ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या १३९३६ एवढी झाली आहे. इस्पितळात नवीन २६९ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
तीन रुग्णांचा मृत्यू
राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह आणखी ३ रुग्णांचे निधन झाले असून कोरोना बळींची संख्या ३८६ एवढी झाली आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये मयडे बार्देश येथील ६३ वर्षाच्या पुरुष रुग्णाचे निधन झाले. तर, दोन रुग्णांना मृतावस्थेत इस्पितळात आणण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्याच्या दैनंदिन अहवालात देण्यात आली आहे.
कुडचडे येथील ५४ वर्षाच्या पुरुष रुग्णाला २५ सप्टेंबरला सकाळी ८ वाजता इस्पितळात आणण्यात आला आहे. तर, राय येथील ६५ वर्षाच्या पुरुष रुग्णाला २३ सप्टेंबरला संध्याकाळी ४.३५ वाजता इस्पितळात आणण्यात आला आहे.