>> मार्गदर्शक तत्वे जारी, विद्यार्थ्यांनी शाळेत येणे ऐच्छिक
येत्या २१ सप्टेंबरपासून अंशतः शाळा सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे काल मंगळवारी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केली आहेत. मात्र शाळेत येणे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
यावेळी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यात कमान सहा फूट अंतर बंधनकारक आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास परवानगी आहे. पण शाळेत येणे बंधनकारक नसून, ऐच्छिक आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील शाळाच उघडता येतील. प्रतिबंधित क्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचार्यांना शाळेत येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. ऑनलाइन वर्ग, टेलिकाउन्सिलिंग आणि इतर कामांसाठी ५० टक्के शिक्षक व कर्मचार्यांना बोलावता येईल. कर्मचार्यांसाठी स्पर्शरहित हजेरीची सोय करावी. समारंभ, खेळ, तसेच गर्दी होईल, असे कोणतेही उपक्रम करू नयेत. असे आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.