२१ जून जागतिक योग दिवस

0
263

गेल्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेमध्ये केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय योगाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जावी असे आवाहन केले होते. त्याला अनुसरून दरवर्षी २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिवस’ म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवले आहे. विशेष म्हणजे भारत सरकारने योग तसेच पारंपरिक भारतीय वैद्यकप्रणालींच्या प्रसारासाठी ‘आयुष’ हे जे नवे खाते निर्माण केले आहे, त्याचे नेतृत्व गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्यापाशी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचविलेल्या या प्रस्तावाला तब्बल १७० देशांनी पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने योग दिवस साजरा करावा या कल्पनेला युरोपीय महासंघाचे सदस्य असलेल्या २८ देशांचा पाठींबा राहील अशी ग्वाही महासंघाचे अध्यक्ष हर्मन व्हॅन रॉम्पूय यांनी मोदींना दिली होती. ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील समतोल साधण्याच्या दिशेने चालना देईल. इतर आंतरराष्ट्रीय दिवस साजरे होतात, तशाच प्रकारे योग दिवसही जगभर साजरा होईल असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे दूत अशोककुमार मुखर्जी यांनी सांगितले.
योगगुरू बाबा रामदेव यांनीही संयुक्त राष्ट्रसंघाच्या या पावलाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या दिवशी जगभरातील कोट्यवधी लोक योगसाधना करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.