भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या सीमावादामध्ये गेल्या २० दिवसांत दोन्ही देशांकडून तीन वेळा गोळीबाराच्या घटना घडल्याचे उघड झाले आहे. येथील फिंगर ३ आणि फिंगर ४ या डोंगराळ भागाला जोडणार्या सीमारेषेवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी बंदुकीच्या शंभर ते दोनशे फैरी झाडल्या होत्या असे आता उघड झाले आहे.
केंद्राने बोलावली सर्वपक्षीय बैठक
चीनशी भारताचा लडाखमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून काल केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीला अनेक राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. चीनशी सुरू असलेल्या तणावावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिले होते. त्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सरकारने लोकसभेत निवेदन दिल्यानंतर या विषयावर विरोधकांनी सविस्तर चर्चेची मागणी केली होती. मात्र ती मागणी फेटाळली. पण सरकारकडून चर्चेसाठी ही बैठक बोलावण्यावर भर देण्यात आल्यानंतर ही बैठक झाली असून आज राज्यसभेत राजनाथ सिंह हे निवेदन देणार आहेत.