>> रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी यांची माहिती
इंडिया मोबाईल कॉंग्रेसच्या कार्यक्रमात काल रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी, २०२१ च्या उत्तरार्धात भारतात जीओतर्फे ५ जी नेटवर्क सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद, रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यानंतर अंबानी यांनी देशात ५ जी सेवा सुरू करण्याबाबत महत्त्वाची घोषणा केली.
रिलायन्स जिओ २०२१ या वर्षाच्या उत्तरार्धात ५ जी सेवा सुरू करण्याची तयारी करत असल्याचे अंबानी म्हणाले. ५ जी नेटवर्क हे संपूर्णपणे स्वदेशीच असेल. याव्यतिरिक्त हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच असेल. जिओद्वारे आम्ही आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे अंबानी म्हणाले.
यावेळी संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी, भारताच्या विकासात दूरसंचार क्षेत्राने मोलाची भूमिका साकारली आहे. सध्या हे क्षेत्र वेगाने पुढे जात आहे. परंतु अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा असल्याचे सांगून कोरोना काळातही तंत्रज्ञानाची मोलाची मदत झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आज देशात आणि जगावर मोबाईने मोठा प्रभाव टाकला आहे. दहा वर्षांपूर्वी त्याचा अंदाज वर्तवणंही कठीण होतं. शेती, आरोग्य विभाग, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांमध्ये याद्वारे सामान्य लोकांच्या जीवनात कसा बदल घडवता येऊ शकतो यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचे असल्याचे मोदी म्हणाले.
आज कोट्यवधी लोकांकडे मोबाईल आहेत. प्रत्येकाची आपली डिजिटल ओळख आहे. यामुळे सरकारला सामान्यांपर्यंत मदत पोहोचवणं सहजरित्या शक्य झाल्याचे सांगून पंतप्रधानांनी आपल्यला आता पुढे जावे लागणार आहे आणि देशात ५ ची स्वप्नही पूर्ण करावे लागणार असल्याचे नमूद केले.