१ मेपासूनचे लसीकरण लांबण्याची शक्यता

0
92

>> आरोग्यमंत्र्यांची माहिती

>> १८ ते ४५ वयोगटासाठी लागणार्‍या लशींची कमतरता

गोवा सरकारने १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांसाठी येत्या १ मेपासून लसीकरणाची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र त्यासाठी लागणारे लशीचे डोस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून १ मे पूर्वी मिळतील की नाही याविषयी साशंकता निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे लसीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल त्याविषयी पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे बोलत होते. आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा यांनी, सीरम इन्स्टिट्यूटकडून आम्हाला लशी कधी मिळतील त्यावर १ मेपासून हे लसीकरण सुरू करता येईल की नाही ते अवलंबून असून लसीकरणाची तयारी झालेली आहे अशी माहिती दिली.

४५ वर्षांवरील लोकांसाठी जेवढ्या लशी लागणार आहेत तेवढ्याच लशी भारत सरकार आम्हाला देणार आहे. उर्वरित लशींची जबाबदारी राज्य सरकारला उचलावी लागणार आहे. त्या अनुषंगाने १८ ते ४५ या वयोगटातील लोकांसाठी लशीच्या ५ लाख डोसांची ऑर्डर गोवा सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला दिलेली आहे. मात्र, सीरम इन्स्टिट्यूटने त्यांच्याकडे भारत सरकारची मोठी ऑर्डर असून त्यामुळे गोवा सरकारला ५ लाख डोस देणे शक्य होणार नसल्याचे कळवले असल्याचे डॉ. डिसा यांनी स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर १८ ते ४५ या वयोगटातील लोकांसाठी येत्या १ मेपासून लसीकरण सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे.
लक्षणे दिसताच कोविडवरील उपचार ः विश्‍वजीत राणे
कोविडची लक्षणे दिसणार्‍या रुग्णांसंबंधीच्या आपल्या प्रोटोकॉलमध्ये बदल करण्याचा निर्णय आता आरोग्य खात्याने घेतला आहे. अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची चाचणी केल्यानंतर त्यांना ताबडतोब कोविडसाठीची औषधे देण्यात येणार असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्याचप्रमाणे राज्यात लॉकडाऊनची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.

चाचणी करण्यासाठी येणार्‍या रुग्णांचे अहवाल मिळण्यास तीन-चार दिवस लागतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी चाचणीला आल्यानंतर ती झाली त्यांना कोविडसाठी औषधे घेण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे. त्या नव्या एसओपीमुळे रुग्णांवर लवकर व योग्यवेळी उपचार होणार असल्याने त्यांच्या जीवावरील धोका टाळण्यास मदत होणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. या नव्या प्रोटोकॉलमुळे राज्यात कोविडमुळे होणारे मृत्यूंचे प्रमाण घटण्यास मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात सध्या कोविडमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ लागले आहेत. ते रुग्ण विलंबाने उपचारासाठी इस्पितळात येत असल्याने असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ज्या लोकांना ताप आहे व कोविडशी संबंधी अन्य लक्षणे आहेत असे लोक जेव्हा चाचणी करून घेण्यासाठी सरकारी इस्पितळात व अन्य चाचणी केंद्रावर येतील तेव्हाच त्यांना कोविडवरील औषधे देण्यात येतील. त्यामुळे प्राथमिक टप्प्यातच त्यांच्यावर उपचार होणार असल्याने त्यांच्या जीवाला असलेला धोका टाळण्यास मदत होणार असल्याचे राणे यांनी नमूद केले. कोविडच्या चाचणीसाठीच्या मशिन्सची संख्या कमी असल्याने सध्या अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. मात्र, आता आणखी मशिन्स आणली जात असल्याने ही समस्याही लवकरच दूर होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात आता बर्‍याच कोविड रुग्णांचे बळी जाऊ लागलेले असून आता आणखी धोका पत्करायचा आमचा विचार नाही. त्यामुळे विनाविलंब औषधोपचार व कोविड उपचारांवरील साधनसुविधा वाढ यावर भर देण्यात आला आहे. ज्या ज्या भागांत मोठ्या संख्येने कोविडचे रुग्ण आढळलेले आहेत तेथे ‘कन्टेन्मेंट झोन’ तयार केल्यास फैलाव रोखणे शक्य असल्याचे राणे यांनी काल स्पष्ट केले.

प्राणवायूअभावी कोविड रुग्णांचे प्राण जाण्याच्या घटना राज्यात घडत आहेत हे खरे आहे काय, असे पत्रकारांनी विचारले असता राज्यात अद्याप एकाही रुग्णाचा प्राणवायूअभावी मृत्यू झाला नसल्याचे राणे व गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्राणवायूची प्रचंड मागणी
कोरोनाची दुसरी लाट ही धोक्याची असून यावेळी झपाट्याने लोकांना संसर्ग होऊ लागला असल्याचे दिसून आले असल्याचे डॉ. बांदेकर यांनी स्पष्ट केले. कोविड रुग्णाची संख्या ‘न भूतो’ अशी वाढू लागलेली असून आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण तर पडला आहेच, शिवाय प्राणवायूची मागणीही प्रचंड वाढली असल्याचे ते म्हणाले.

लसीकरण लोकांना वाचवेल
पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी कुणाचा मृत्यू झाला असल्याचे आढळून आले आहे काय असे पत्रकारांनी विचारले असता अशा एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे डॉ. बांदेकर यांनी स्पष्ट केले. पहिला डोस घेतलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांना घातक स्वरुपाचा संसर्ग होत नसल्याने त्यांना न्युमोनियाच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका उद्भवत नसल्याचे डॉ. बांदेकर म्हणाले. दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीलाही संसर्ग होऊ शकतो. पण त्याच्या जीवाला मुळीच धोका निर्माण होऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकांनी मोठ्या संख्येने लस टोचून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून कोविड रुग्णांसाठीचे नवे प्रोटोकॉल तयार करण्यात आले आहेत. ह्या प्रोटोकॉलमुळे गंभीर अवस्थेत इस्पितळात भरती होण्यासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या घटणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

आवश्यक तेवढे डोस सीरम देणार ः मुख्यमंत्री
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदर पुनावाला यांच्याशी आपण कोविड लशींच्या डोसांबाबत बोललो असून त्यांनी १८ ते ४५ वयोगटातील लोकांसाठी आवश्यक तेवढे डोस उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन आपणाला दिले असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

या वयोगटातील लोकांसाठी आम्ही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे लशींच्या डोसांची ऑर्डर दिलेली आहे. मात्र भारत सरकारला मोठ्या संख्येने लशींचा पुरवठा करावा लागणार असल्याने तुमच्या लशींच्या ऑर्डरला विलंब होऊ शकतो असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कळवले असल्याची आरोग्य खात्यातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल वरील स्पष्टीकरण केले.

गोमेकॉला रोज एक कोटी लिटर प्राणवायूची गरज
गंभीर स्थितीतील कोविड रुग्णांना लागणार्‍या वैद्यकीय प्राणवायूविषयी विचारले असता सध्याच्या स्थितीत एका गोमेकॉलाच प्रतिदिन एक कोटी लिटर एवढ्या प्राणवायूची गरज भासत आहे. पुढील काळात ती वाढून प्रती दिन तीन कोटी लिटर एवढीही होऊ शकते, असे डॉ. बांदेकर म्हणाले. सध्या राज्यात होणार्‍या उत्पादनाबरोबरच बेळ्ळारी व कोल्हापूर येथूनही वैद्यकीय प्राणवायू आणला जात असल्याचे ते म्हणाले. द्रव रुपातील प्राणवायू साठवून ठेवण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात एक मोठी टाकी बांधण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

गोमेकॉत २५० तर मडगावात
६० रुग्ण व्हेंटिलेटरवर

दरम्यान, या घडीला गोमेकॉत २५० तर मडगाव येथील दक्षिण जिल्हा इस्पितळात ६० रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती डॉ. बांदेकर व डॉ. जुझे डिसा यांनी दिली. ही गंभीर बाब लक्षात घेऊन लोकांनी कोरोनासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कडकपणे पालन करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.