दाबोळी विमानतळावर काल सकाळी उतरलेल्या एअर इंडियाच्या विमानात एका आसनावर सापडलेल्या बेवारस पाकिटातील १९ लाख रुपये किमतीची ६ सोन्याची बिस्किटे कस्टम अधिकार्यांनी जप्त केली.
याविषयी वृत्त असे की, कस्टम विभागाचे हवाई गुप्तहेर विभागाचे अधिकारी काल सकाळी एअर इंडिया फ्लाईट (एआय – ९९४) मध्ये तपास करीत असताना एका आसनावर त्यांना एक पाकिट नजरेस पडले. या अधिकार्यांनी हे पाकिट उघडून पाहिले असता त्यांना त्यात ६ सोन्याची बिस्कीटे आढळली. सदर बिस्कीटे १० तोळे वजनाची असून त्याची किंमत १९ लाख एवढी आहे. दरम्यान या पाकिटाविषयी कस्टम अधिकार्यांनी या विमानातील प्रवाशांकडे विचारपूस केली असता कोणीही या पाकिटावर आपला दावा केला नाही. सदर सोने कस्टम अधिकार्यांनी जप्त केले असून सदर कारवाई कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त जी. बी. शांतीमोन यांनी केली आहे.