१९ नव्या उद्योगांमुळे १४ हजार नोकर्‍या उपलब्ध होणार : गुदिन्हो

0
26

>> ५००० कोटींची गुंतवणूक अपेक्षित

राज्यात नवीन १९ उद्योग कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी पुढे आल्या आहेत. त्यांच्यामार्फत राज्यात सुमारे ५००० कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे. तसेच, १४ हजार नोकर्‍या उपलब्ध देखील होणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात कालपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय ‘इन्वेस्ट गोवा २२’ या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात नवीन उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी नवीन उद्योग धोरण जाहीर केले आहे. नवीन उद्योग धोरणाला अनुसरून राज्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी गुंतवणूकदार पुढे येत आहेत. गोवा गुंतवणूक आणि प्रोत्साहन मंडळाकडे आत्तापर्यंत १९ कंपन्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. त्या उद्योगांना पुढील प्रक्रिया करण्यासाठी शुक्रवारी मान्यता पत्रे जारी केली जाणार आहेत, असेही गुदिन्हो यांनी सांगितले. दाबोळी आणि मोपा या दोन विमानतळांमुळे राज्यात लॉजिस्टिक उद्योगाला चांगली संधी आहे, असेही गुदिन्हो म्हणाले.