>> गडचिरोलीत पोलिसांशी चकमक
महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात राज्याच्या विशेष कमांडो पोलिसांच्या एका कारवाईदरम्यान उडालेल्या चकमकीत काल १६ नक्षलवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनी सी-६० कमांडो या विशेष पथकाच्या या कारवाईची माहिती दिली.
सदर भागात अजूनही नक्षलवाद्यांना हुडकण्याचे काम सुरू असल्याचे शेलार यांनी सांगितले. ही मोहीम विशेष कमांडो पथकाने काल सकाळी सुरू केली होती. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम भाम्रागडमधील ताडगाव जंगल भागात सुरू होती. साईनाथ व साईन्यू या नक्षलवाद्यांच्या दोन म्होरक्यांचाही ठार झालेल्या नक्षलवाद्यांत समावेश असल्याचे शेलार म्हणाले. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी कमांडो पथकाचे अभिनंदन केले आहे. अलीकडील काळातील नक्षलींविरोधातील ही मोठी कारवाई असल्याचे माथूर यांनी सांगितले. सर्व नक्षल्यांचे मृतदेह मिळाल्याचे सांगण्यात आले. याआधी गेल्या ३ एप्रिल रोजी पोलिसांबरोबरील चकमकीत ३ नक्षली ठार झाले होते. त्यात दोन महिला होत्या. सदर भागात नक्षली व स्थानिक यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू असतो.