भारताच्या युवा खेळाडूंची सनसनाटी कामगिरी काल गुरुवारीदेखील कायम राहिली. १५ वर्षीय शार्दुल विहान याने डबल ट्रॅप प्रकारात रौप्यपदकाची कमाई करत भारताच्या खात्यात अजून एक रुपेरी पदक टाकले. आशियाई क्रीडा स्पर्धेक पदक जिंकणारा तो बारताचा सर्वांत युवा खेळाडू ठरला. कोरियाचा शून ह्युनवो ७४ गुणांसह पहिल्या तर विहान ७३ गुण घेत दुसर्या स्थानी राहिला. दोन्ही खेळाडूंच्या वयात १९ वर्षांचे अंतर असताना विहानने शून याचा घामटा काढताना केलेली कामगिरी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.
कतारच्या अल मारी हम्मादने ५३ गुण मिळवून कांस्य पदक मिळविले. पात्रता फेरीत शार्दुलसह अंकुर मित्तल हा देखील होता. विहानने पात्रता फेरीत १४१ गुण घेऊन अंतिम फेरीत प्रवेश केला तर अंकुरला १३४ गुणांमुळे नवव्या स्थानी समाधान मानावे लागले. मागील वर्षी मॉस्को येथे झालेल्या आयएसएसएफ जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत सहावे स्थान मिळवून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होोते. व्हिडिओ गेम्स व सायकलिंगचा प्रचंड चाहता असलेला व इयत्ता नववीचा विद्यार्थी असलेल्या विहानचे क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी अभिनंदन केले आहे.