१५ मार्चला जिल्हा पंचायत निवडणुका

0
102

पंचायत संचालक आज मुख्यमंत्र्यांना भेटणार
जिल्हा पंचायतीच्या निवडणुका दि. १५ मार्च रोजी घेण्याचे सरकारने निश्‍चित केले असून प्रभागांची फेररचना व आरक्षणाचा तपशील घेऊन पंचायत संचालक गुरुदास पिळर्णकर आज मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेऊन निवडणूक कार्यक्रम निश्‍चित करणार आहेत.
यावेळी सरकारने उत्तर गोव्यात २५ व दक्षिण गोव्यात २५ मतदारसंघ अशी फेररचना केली आहे. यासंबंधी आवश्यक असलेले कायदेशीर सोपस्कारही वटहुकूमाद्वारे पूर्ण करण्याची सरकारने तयारी ठेवली आहे. प्रत्येक मतदारसंघ १७ ते १८ हजार मतदारांचा असेल, अशा पद्धतीने रचना केल्याचे सांगण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने सरकारला दि. १५ मार्च पर्यंत निवडणुका घेण्यास सांगितले होते. प्रभागांच्या फेररचनेच्या बाबतीत सरकारची तयारी नव्हती. घटनेनुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा पंचायत निवडणुका लांबणीवर टाकण्याचा अधिकार सरकारला नाही. त्यामुळे सरकारने घाईगडबडीत प्रभागांची फेररचना केली आहे. त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. फेररचना करताना विरोधकांचे पत्ते कापण्याचाही विचार पुढे ठेवल्याचे कळते.
बार्देस तालुक्यात जिल्हा पंचायतीचे आठ मतदारसंघ होते, त्यात एक प्रभाग वाढवून ९ केले आहेत. त्याचप्रमाणे फोंडा तालुक्यातही एक मतदारसंघ वाढवून संख्या ७ केली आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचे वर्चस्व असलेला साळगाव प्रभाग महिलांसाठी राखीव केला आहे.
पक्ष पातळीवर निवडणुका घेण्यास कॉंग्रेसचा विरोध
जिल्हा पंचायतीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर घेण्याच्या भाजप सरकारच्या निर्णयास कॉंग्रेसचा विरोध असून या प्रश्‍नावर आपला पक्ष आवाज उठविणार असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
विरोधी पक्षासह अन्य संबंधित घटकांना वरील निर्णय घेण्यापूर्वी विश्वासात घेण्याची गरज होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घटनेच्या ७३ व्या व ७४ व्या कलमात दुरुस्ती करून पंचायतींना अधिकार दिला होता, असे असतानाही पक्षीय पातळीवर निवडणूक लढविणे अयोग्य असल्याचे फालेरो यांनी सांगितले.
भाजप सरकारचा लोकशाहीवर विश्‍वास नाही. त्यामुळेच त्यांनी पक्षीय पातळीवर वरील निवडणुका घेण्याचे ठरविले आहे. त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागेल, असा इशारा फालेरो यांनी दिला.