१५,७५० कोटींच्या तोफा खरेदीचा प्रस्ताव संमत

0
103

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांनी घेतला निर्णय
भारताला लष्कराला १५,७५० कोटी रुपयांच्या ८१४ तोफा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला काल संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मान्यता दिली. संरक्षण खात्याच्या संरक्षण संपादन मंडळाच्या आपल्या पहिल्या बैठकीत पर्रीकर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या व्यतिरिक्त टाटा सन्स व एअर बस यांच्या संयुक्त प्रकल्प असलेला प्रस्ताव लांबणीवर टाकण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.गेल्या वर्षी सादर केलेल्या ‘खरीदा व तयार करा’ या तत्त्वावर वरील प्रकारच्या १०० तयार तोफा खरीदण्यात येणार असून ७१४ भारतात तयार केल्या जातील. बोफोर्स तोफांचा घोटाळा १९८६ साली झाल्यानंतर भारतीय लष्कराने सुमारे तीन दशके तोफांची खरेदीच केलेली नाही. मात्र आता या तोफांचा पुरवठा करण्याची प्रक्रिया वेगवान होण्यावर पर्रीकर यांनी भर दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आतापर्यंत अशा तोफांच्या खरेदीसाठी सहा निविदा जारी करण्यात आल्या. परंतु त्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून रद्द करण्यात आल्या अशी माहिती सूत्रांनी दिली. याआधी १९९९ साली तयार केलेल्या लष्कराच्या पायदळ राष्ट्रीयीकरण योजनेखाली अशा तोफांची खरेदी करण्यासाठी पहिल्यांदा योजना आखण्यात आली होती.
या पार्श्‍वभूमीवर कालच्या पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली वरील मंडळाच्या बैठकीत तोफा खरेदीचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत १५५ मि. मि./५२ या श्रेणीच्या वाहनावर आरूढ तोफा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे भारतीय लष्करातील सूत्रांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार या तोफा खरेदीसाठी सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून विनंती प्रस्ताव (आरएफपी) मागविण्यात येणार आहेत. अशा भारतीय खाजगी कंपन्यांमध्ये एल अँड टी, टाटा व भारत फोर्ज यांचा समावेश आहे.
भारतीय कंपन्यांची निवड झाल्यास त्या महत्त्वाच्या भागीदार ठरतील. त्यानंतर या कंपन्यांना या तोफा पूर्णपणे तयार करण्याची क्षमता दाखवावी लागेल किंवा त्यासाठी विदेशी कंपन्यांबरोबर करार करावा लागेल.