>> शिक्षण संचालकांकडून आदेश जारी; २ सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांनाही नवी नावे
राज्यातील १४ सरकारी माध्यमिक विद्यालये आणि २ सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांना हुतात्म्यांची नावे देणारा आदेश शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी काल जारी केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील सरकारी माध्यमिक विद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्याची घोषणा स्वातंत्र्यदिन सोहळ्यात केली होती. आता शिक्षण खात्याने १४ सरकारी विद्यालये आणि २ उच्च माध्यमिक विद्यालयांना गोवा मुक्ती लढ्यातील हुतात्म्यांची नावे दिल्याचे जाहीर केले आहे.
राज्य सरकारच्या गृह खात्याने (सामान्य) गोवा मुक्ती लढ्यातील हुतात्म्यांची नावांची यादी उपलब्ध केली होती. शिक्षण खात्याने सदर यादी सरकारी माध्यमिक विद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालयांच्या व्यवस्थापनांकडे पाठवून त्यांना विद्यालयांसाठी नाव निवडण्याची सूचना केली होती. त्यानंतर राज्यातील काही माध्यमिक विद्यालयांच्या पालक-शिक्षक संघ, विद्यालय व्यवस्थापन समित्यांनी हुतात्म्यांच्या नावांची निवड करून पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण खात्याकडे पाठवली होती. तसेच बर्याच माध्यमिक विद्यालयांनी नावे विचारात घेण्यास नकार देत विद्यालयाचे सध्याचेच नाव कायम ठेवण्याची विनंती केली.
ज्या सरकारी माध्यमिक विद्यालये आणि सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयांना हुतात्म्यांची नावे दिली आहे, ती पुढीलप्रमाणे आहेत. हुतात्म्या जे. ए. चोपडेकर (आगरवाडा पेडणे विद्यालय), शहीद राम सिंग (तोरसे पेडणे विद्यालय), तुळशीराम बाळकृष्ण हिरवे (वझरी पेडणे विद्यालय), हुतात्मा बाळा गोपाळ देसाई (दाडाचीवाडी धारगळ विद्यालय), कृष्णा शाबा शेट (आल्त बेती पर्वरी विद्यालय), हुतात्मा बाबुली नारायण गवस (कासारपाल डिचोली विद्यालय), रामनाथ नाईक (तारमाथ सुर्ल विद्यालय), सोमा रामा मळीक (मोर्ले कॉलनी, सत्तरी विद्यालय), पुरुषोत्तम केरकर (दोनापावल विद्यालय), परशुराम मेमोरियल (मेरशी विद्यालय), कामिल परेरा (सदर फोंडा विद्यालय), रजनीकांत केंकरे (विद्यानगर आके मडगाव विद्यालय), रजनीकांत केंकरे (वास्को मुख्य-मुरगाव विद्यालय), कामिल परेरा (बायणा-वास्को विद्यालय) यांची नावे या सरकारी माध्यमिक विद्यालयांना दिली आहेत. खांडोळा सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाला कृष्णा वासुदेव परब, तर बायणा-वास्को येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाला रामनाथ नाईक यांचे नाव देण्यात आले आहे.