१२ वर्षांखालील मुलांसाठी लस २०२२ नंतर ः पुनावाला

0
61

देशातील १२ वर्षांखालील मुलांसाठी कोरना प्रतिबंधक लस २०२२ मध्ये उपलब्ध होईल असे सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी काल सांगितले. तसेच त्यांनी यावेळी सीरममध्ये उत्पादित केली जाणारी कोवोव्हॅक्स लस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उपलब्ध होईल अशी माहिती त्यांनी दिली.

कोवोव्हॅक्स लशीची दोन ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांवर दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील चाचणीच्या परवानगीची मागणी केली होती. मुलांसाठीच्या या चाचणीसाठी देशभरात १० ठिकाणाहून ९२० मुले चाचणीत सहभागी होणार आहेत. यात १२ ते १७ आणि २ ते ११ या वयोगटातील प्रत्येकी ४६० मुलांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्थिक बाबतीत भारत सरकार पूर्णपणे सहकार्य करत असल्याचे यावेळी पुनावाला यांनी स्पष्ट केले. लशीच्या पुरवठ्याबाबत बोलताना त्यांनी दर महिन्याला सीरमकडून १३ कोटी लशींचा पुरवठा केला जात असल्याची माहिती दिली.

लशीला मंजुरी मिळाल्यानंतर कोवोव्हॅक्सची किंमत सर्वांना कळेल असे पुनावाला यांनी पुढे सांगितले. कोवोव्हॅक्स दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटिश व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचे आढळले आहे. सप्टेंबर २०२० मध्ये नोवाव्हॅक्सने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत करार केला होता. भारतात या लशीला मान्यता मिळाल्यानंतर ती कोवोव्हॅक्स नावाने ओळखली जाणार आहे.

नोवाव्हॅक्सने भारतीय औषध नियंत्रण मंडळाकडे ‘कोवोव्हॅक्स’ लशीच्या आपत्कालीन वापराची मंजुरी मागितली आहे. तिला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात १८ वर्षांवरील नागरिकांना लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तर लहान मुलांना या लशीचे डोस २०२२ या वर्षात उपलब्ध होतील, अशी माहिती पुनावाला यांनी दिली.