१२ लाखांचे ड्रग्स दोन कारवायांत जप्त

0
85

अमलीपदार्थ विरोधी पोलीस स्टेशन आणि गुन्हा अन्वेषण विभाग यांनी काल शुक्रवारी उत्तर गोव्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून अंदाजे १२ लाख रूपयांचे अमली पदार्थ हस्तगत करून दोघांना अटक केली आहे.

अमलीपदार्थ विरोधी पोलीस स्टेशनच्या पथकाने पहाटे ५ च्या सुमारास हरमल पेडणे येथे मासळी मार्केटजवळ सापळा रचून अक्षत अनंत कुमार (२३) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २.५०० किलो ग्रॅ्रम गांजा आणि १.१०० किलो ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या अमली पदार्थाची किंमत अंदाजे ४.५० लाख एवढी आहे. पोलीस उपनिरीक्षक राहूल नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.

तर, गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने हणजूण येथे छापा घालून मिनिनो फेलिक्स फर्नांडीस (५८) याला अटक केली आहे. संशयित मिनिनो हणजूण येथील रहिवाशी आहे. त्याच्याकडून ६७ ग्रॅम एमडीएमए आणि ९.३९ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. हस्तगत केलेल्या अमलीपदार्थाची किंमत अंदाजे ७.५० लाख एवढी आहे. पोलीस उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, उपनिरीक्षक सुजय कोरगावकर, उपनिरीक्षक ऍडवीन डायस, कॉस्टेबल विनायक सावंत, श्रीराम साळगावकर, विजय श्रीवास्तव, अशोक गावडे यांनी छापा घातला. पोलीसांनी अमली पदार्थाच्या विरोधात जोरदार मोहीम चालविली आहे. अमलीपदार्थ विरोधी पथकाने मागील दीड महिन्यात सहा प्रकरणांची नोंद केली आहे.