आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा
१०८ रुग्णवाहिका सेवेची गाडी रुळावर आणण्यासाठी आपण ११ नव्या रुग्णवाहिका आणल्या असून लवकरच त्या मार्गावर आणल्या जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी काल दिली.एकूण ३२ रुग्णवाहिकांपैकी २५ रुग्णवाहिका सध्या चालू आहेत. दोन खराब झाल्याने भंगारात काढण्यात आल्या आहेत तर अन्य पाच नादुरुस्त असल्याने सेवेत नसल्याचे ते म्हणाले.
विकत घेतलेल्या ११ नव्या गाड्या बॉडी बांधण्यासाठी पाठवलेल्या आहेत. आठेक दिवसांत ते काम पूर्ण होणार असून त्यानंतर या गाड्या रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. गेले काही महिने ३२ रुग्णवाहिकांपैकी सात रुग्णवाहिका सेवेत नसल्याने गैरसाये होत असे. त्यामुळे नव्या गाड्या घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीची प्रक्रिया विविध कारणांमुळे लांबली. पण आता आणखी जास्त काळ वाट पहावी लागणार नसल्याचे डिसोझा म्हणाले.
संप मिटवण्यासाठी प्रयत्नरत
दरम्यान, १०८ रुग्णवाहिका कर्मचार्यांचा सुरू असलेला संप मिटावा असे आपणालाही वाटत असून त्यासाठी आपण प्रयत्नरत आहे. संप मिटवण्यासाठी आपण प्रयत्न करीत नसल्याची खोटी माहिती पसरविली जात आहे, असे ते म्हणाले.
१०८ सेवा देणारी जीव्हीके ही कंपनी संपावर असलेल्या कर्मचार्यांपैकी ११ जणांना सोडल्यास इतर कर्मचार्यांना सेवेत घेण्यास तयार आहे. त्या अकरा जणांमुळे प्रकरण चिघळले आहे, असे डिसोझा म्हणाले.
दरम्यान, १०८ रुग्णवाहिका सेवा कर्मचारी संघटनेने आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यावर आरोप करताना ते संप मिटवण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत व संप मिटवण्यासाठी आपण मध्यस्थी करणार नाही असे विधान त्यांनी केल्याचे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे, असे म्हटले आहे. आपण या प्रकरणी मध्यस्थी करणार नाही असे आरोग्यमंत्र्यांनी म्हणणे चुकीचे आहे. आरोग्यमंत्री या नात्याने हा प्रश्न सोडवणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.