>> संशयितास अटक
कळंगुट येथे १०८ रुग्णवाहिकेच्या चालकासह महिला कर्मचार्याला मारहाण केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी तक्रारीनंतर म्हापसा पोलिसांनी कारवाई करत संशयिताला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास कळंगुट येथे अपघात झाल्याची माहिती १०८ प्रशासनाला मिळाली. त्यानंतर काही मिनिटांत १०८ रुग्णवाहिकेसह चालक दयेश परवार आणि महिला कर्मचारी स्वप्नाली कुराणे घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने अपघातातील जखमींसाठी मदतकार्य सुरू केले. यावेळी अपघातात जखमी झालेल्याचा इसमाचा मित्र मनप्रीत सिंग घटनास्थळी हजर होता. जखमीला रुग्णवाहिकेत घालून हॉस्पिटलमध्ये नेताना मनप्रीत सिंग याने १०८ रुग्णवाहिकेतील चालक आणि महिला कर्मचार्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावरच न थांबता त्याने दोघांनाही मारहाण केली. या मारहाणीत रुग्णवाहिका चालकाच्या डोक्याला दुखापत झाली.
या प्रकारानंतर स्वप्नाली कुराणे यांनी जवळच्या पोलिस स्थानकात धाव घेत याविषयी तक्रार दाखल केली. त्यानंतर म्हापसा पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत संशयित मनप्रीत सिंग याला अटक केली.