१०५ नवे कोरोना रुग्ण, तीन बळी

0
236

राज्यात चोवीस तासांत नवीन १०५ कोरोना रुग्ण आढळून आले असून ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बळीची एकूण संख्या ७३४ एवढी झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५० हजार ७७२ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ९५५ एवढी आहे.
राज्यात मागील चार दिवस शंभरपेक्षा कमी नवीन कोरोना रुग्ण आढळून येत होते. यापूर्वी २३ डिसेंबरला नवीन १२५ कोरोना रुग्ण आढळून आले होते.
राज्यातील आणखी ९१ कोरोना रुग्ण बरे झाले आहे. बरे झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ०८३ एवढी झाली असून कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६७ टक्के एवढे आहे.

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी ५८ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ३६ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. इस्पितळात दाखल केलेल्या एकूण कोरोना रुग्णाची संख्या १४ हजार २९२ एवढी झाली आहे.
राज्यात नाताळनंतर मागील तीन दिवसांत कोविड स्वॅबच्या तपासणीमध्ये घट झाली आहे. २५ डिसेंबरपर्यंत दरदिवशी साधारणपणे दीड हजारापेक्षा जास्त कोविड स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी केली जात होती. परंतु, २६ डिसेंबरला १२०५ स्वॅब आणि २७ डिसेंबरला १३२९ स्वॅब आणि २८ डिसेंबरला ११७४ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे.

पणजीत नवे ७ रुग्ण
पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात नवीन ७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पणजीतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ७० झाली आहे. मिरामार, करंजाळे, पणजी शहर या परिसरात नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ८० रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ७१ रुग्ण, पर्वरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ६४ रुग्ण, चिंबल आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ५३ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे. तीन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.