१०० टक्के लसीकरण

0
24

गोव्याने शंभर टक्के कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केलेले असल्याचा दावा सरकारच्या आरोग्य खात्याने केला आहे. त्यामुळे सात लसीकरण केंद्रे बंद करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. वास्तविक, अजूनही आपल्या आजूबाजूच्या कित्येक व्यक्तींनी कोरोनावरील लस घेतली नसल्याचे सर्रास दिसते आहे. त्यामुळे संपूर्ण लसीकरणाचा हा दावा कितपत खरा याबाबत साशंकता आहे. यापूर्वीही सरकारने लसीकरणाबाबत केलेले दावे फसवे असल्याचे नंतर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूकांडातून स्पष्ट झाले होते. एकीकडे शंभर टक्के लसीकरणाचा दावा करायचा आणि दुसरीकडे कोरोनामुळे दिवासगणिक होणारे मृत्यू हे लस न घेतलेल्यांचे असल्याचे सांगायचे या विसंगतीवर आम्ही बोट ठेवले होते. त्यामुळे जर खरोखर लसीकरण पूर्ण झालेले असेल तर ती निश्‍चितपणे प्रशंसनीय बाब आहे, परंतु उद्या जर सध्या सुरू असलेले मृत्युकांड सुरूच राहिले आणि मग पुन्हा हे मृत्युमुखी पडणारे लस घेतलेल्यांपैकी नव्हते असे जर सरकार सांगू लागले तर मात्र हा फुगा फुटेल. तेव्हा आरोग्य संचालकांनी विचारपूर्वक जनतेला माहिती द्यावी हे श्रेयस्कर ठरेल.
आज राज्यातील नवी कोरोना रुग्णसंख्या कमी असल्याचे सरकारची दैनंदिन आकडेवारी सांगते. त्यामुळे राज्यातील कागदावरील सक्रिय रुग्णसंख्याही झपाट्याने कमी होत चाललेली दिसते. त्यामुळे कोरोना अस्तित्वातच नाही असा ग्रह करून आम जनजीवन चाललेले दिसते. कोठेही कोणीही मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन यांचा वापर फारसा करताना दिसत नाही. कोणत्याही आस्थापनांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझेशनचा आग्रह धरला जाताना पाहायला मिळत नाही. सगळे काही आलबेल आहे असेच राज्यात चित्र आहे आणि याला सरकारची ही आकडेवारी जबाबदार आहे.
कोरोनाचे प्रमाण जर एवढे अत्यल्प असेल तर मग प्रत्यक्षात रोजचे मृृत्यूसत्र मात्र सुरूच आहे हे कसे? या प्रश्नाचे पटण्याजोगे स्पष्टीकरण सरकारने द्यायला हवे. आजकाल कोरोनाची लक्षणे दिसून येताच अधिकृतरीत्या कोरोना चाचणी न करताच औषधोपचार सुरू करण्याकडे जनतेचा कल दिसून येतो, कारण चाचणी करा, अहवाल येईपर्यंत वाट पाहा हे करण्यापेक्षा लवकरात लवकर थेट औषधोपचार सुरू केला तर दोन तीन दिवसांत ताप जातो. इतर लक्षणेही कमी होत जातात असा अनुभव या तिसर्‍या लाटेत येत आहे. त्यामुळेच कोरोनाबाबतची भीतीही कमी होत गेली आहे. हे काही फार चिंता करण्यासारखे नाही. ही आता महामारी उरलेली नाही. सर्दी पडशासारखाच तो सामान्य आजार बनून राहिला आहे असा दिलासा जनतेला मिळालेला दिसतो. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला कारणीभूत असलेला ओमिक्रॉन व्हेरियंट हा फुप्फुसात जात नाही, तर तो घशापुरताच सीमित उरतो असेच आतापर्यंत तरी दिसून आलेले असल्याने योग्य औषधे, प्रतिजैविके घेतली तर त्यावर मात करता येऊ शकते असा विश्वासही जनतेला मिळाला आहे. परंतु मुळातच रक्तदाब, ह्रदयविकार, मधुमेह आदी अन्य आजार असलेल्या व्यक्तींसाठी कोरोना अजूनही तितकाच घातक ठरू शकतो हेही विसरून चालणार नाही. कोरोनाचे सध्याचे नवे रूप जर एवढे साधे असते तर इतकी माणसे मृत्युमुखी कशी पडली असती? रोज किमान चार पाच माणसे कोरोनाने अजूनही बळी चालली आहेत. फक्त नवी रुग्णसंख्या मुळात चाचण्याच कमी होत असल्याने खूपच कमी दिसत असल्याने या मृत्यूच्या आकड्यांमुळे पूर्वीसारखी घबराट आज दिसत नाही. त्यामुळेच जनता निर्धास्त आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन हा व्हेरियंट शेवटचा असेल आणि त्यानंतर ही महामारी निवळेल असे सांगता येत नाही असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. परंतु अजून तरी आणखी व्हेरियंट जगात कुठे अवतरलेला दिसलेला नाही. त्यामुळे गेली दोन वर्षे जगाला व्यापून राहिलेली ही महामारी आता संपुष्टात येईल, किमान तिचे गांभीर्य तरी कमी होईल अशी आशा करायला वाव आहे. जगभरामध्ये आता कोरोना निर्बंधांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जनता निदर्शने करू लागल्याचे, सरकारविरोधी भूमिका घेऊ लागल्याचेही पाहायला मिळत आहे. कोरोनाचा धोका पत्करू, परंतु आता अर्थव्यवस्थेवर, व्यवसायांवर कोणतेही निर्बंध घालू नका अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. या दबावामुळे सरकारकडूनही कोरोनाबाबत सावध भूमिका स्वीकारली जाताना दिसते. पण अजूनही हा विषाणू आसपास आहे हे भान जर ठेवले नाही तर परिस्थिती पुन्हा बिघडू शकते हे विसरून कसे चालेल? त्यामुळे अजूनही चेहर्‍यावर मास्क, हातावर सॅनिटायझर यांचा वापर अपरिहार्यच आहे. कोरोना आपल्या आजूबाजूला अजूनही दबा धरून आहे एवढे भान सार्वजनिक जीवनात वावरताना ठेवले तरी पुरेसे आहे.