>> शिक्षण खात्याकडून आदेश जारी; कोविडबाधित घटल्याने निर्णय
राज्य सरकारने कोविड महामारीच्या तिसर्या लाटेमध्ये राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने बंद केलेले विद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग सोमवार दि. २१ फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू करण्याबाबतचा आदेश काल शिक्षण खात्याने जारी केला. त्यामुळे सोमवारपासून पुन्हा एकदा शाळा मुलांच्या उपस्थितीने गजबजणार आहेत.
विद्यालयाच्या व्यवस्थापनाने कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून वर्ग सुरू करावेत, असे शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये कोविडच्या दुसर्या लाटेतील कोरोना बाधिताच्या संख्येत घट झाल्यानंतर राज्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग प्रथम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर अकरावी, नववी, आठवी आणि सातवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. तथापि, कोरोनाच्या तिसर्या लाटेत जानेवारी महिन्यात कोविडबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याने राज्यात सुरू करण्यात आलेले विद्यालयांचे सातवी ते बारावी, तसेच महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग २६ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतरही कोरोनाबाधितांच्या संख्येत घट न झाल्याने विद्यालयांचे वर्ग १४ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मुदत संपली तरी शिक्षण खात्याकडून शाळा सुरू करण्याबाबत कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. फेब्रुवारीत कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याने विद्यालयांचे वर्ग कधी सुरू होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले होते.
कोरोना रुग्ण घटल्याने शाळा सुरू : मुख्यमंत्री
गोव्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यालयाचे पहिली ते बारावी आणि महाविद्यालयांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. शिक्षण खाते शालेय गणवेश, पुस्तके, वेळापत्रक आदी विषयावर पालक-शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघटना, पालक यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार आहे. राज्यातील यापुढील शालेय परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दहावी-बारावीची द्वितीय
सत्र परीक्षा ५ एप्रिलपासून
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या दुसर्या सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून, येत्या ५ एप्रिल २०२२ पासून दहावी व बारावीची द्वितीय सत्र परीक्षा घेतली जाणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ पासून दहावी आणि बारावीसाठी दोन सत्रांत परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दहावी आणि बारावीची पहिली सत्र परीक्षा डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात आली.
आता दहावीची द्वितीय सत्र परीक्षा ५ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे, तर बारावीची कला, विज्ञान, वाणिज्य, व्यावसायिक शाखेची द्वितीय सत्र परीक्षा ५ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे.
मंडळातर्फे बारावीची अंतिम प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्च ते १८ मार्च या कालावधीत, तर बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्च ते २५ मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षेवेळी कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाणार आहे.