- प्रा. रमेश सप्रे
हे इतकं विस्तारानं सांगायचं एकच कारण म्हणजे या कटू सत्यस्थितीचा नि यातून निर्माण होणार्या, नव्हे होत असलेल्या अपराधांचा; अंतिम, टोकाच्या निर्णयांचा नि आत्मघातासारख्या कृतींचा योग्य विचार करून वेळीच सर्वांनी सावध व्हावं. पण याच्या पोटात एक दैवदुर्विलास दडलेला आहे, तो म्हणजे ज्यांना खरी गरज आहे ते वाचणार नाहीत…
‘कठोपनिषद’ हे महत्त्वाचं उपनिषद. सुमारे चारहजार वर्षांपूर्वी ते लिहिलं गेलं असं मानलं जातं. मृत्युदेवता यम आणि तेजस्वी ऋषिकुमार नचिकेता यांच्यातील आजही सार्या मानवजातीला उद्बोधक असलेला संवाद हा कठोपनिषदाचा आशय आहे. विषय आहे मृत्युसंबंधात पण प्रत्यक्षात नरदेहाचं साधन आणि नरजन्माची संधी लाभल्यावर आदर्श ‘मानव जीवन’ कसं जगावं याचं मार्गदर्शन साक्षात यमराजानं घडवलं आहे. या प्रसंगाच्या पार्श्वभूमीला असलेला कथाभाग पाहिल्यावनर प्रत्यक्ष संवादाचा गाभा पाहू या. जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या अगदी भिकार्यापासून ते सर्वोच्च सत्ताधार्यांपर्यंत सर्वांच्या जीवनात रोज असंख्य घटना-प्रसंग घडत असतात. त्यात सर्व प्रकारचे अनुभव दडलेले असतात. उदा. मान-अपमान, सुख-दुःख, यश-अपयश, लाभ-हानी, अगदी वेदना, व्याधी, जिवावर बेतलेले प्रसंग यांचा समावेशसुद्धा या दैनंदिन अनुभवात असतो. कधी चांगल्या-वाईट प्रसंगांच्या निमित्तानं जीवनात खोल शिरून राहणारे अनुभवही घ्यावे लागतात. पण फार थोड्या व्यक्ती यातून योग्य तो बोध घेऊन आपली जीवनं सुधारतात. यासाठी कठोपनिषदासारख्या ग्रंथातून चिरकालीन प्रेरणा नि मार्गदर्शन मिळतं.
श्रेयस आणि प्रेयस या मुख्य प्रेरणा माणसाच्या जीवनाला असतात. बहुसंख्य लोकांच्या या दोन्ही प्रेरणांचं संयुक्त स्वरूप दिसतं. प्रपंच आणि परमार्थ, जडवाद नि आध्यात्मिक जीवनपद्धती अशी नावं या मूळ प्रेरणांना दिली जातात. श्रेयस म्हणजे जीवनातील शुद्ध आनंदासाठी, मुक्तीच्या अनुभवासाठी प्रेरणा तर प्रेयस म्हणजे मुख्यतः देहाशी संबंधित, प्रपंचातील सुखसोयींबद्दल प्रयत्न करण्याची प्रेरणा.
यमानं देहभोगाशी संबंधित विविध वस्तू, व्यक्ती यांचं आमिष (लालूच) दाखवूनही नचिकेत्यानं निग्रहपूर्वक सर्व गोष्टी नाकारल्या. यानंतर यमराज- नचिकेता यांच्यातील संवाद अर्थपूर्ण वळण घेतो. आपल्याला अधिक अंतर्मुख बनवतो. या उपनिषदाची भाषा काहीशी अवघड आहे पण नीट समजून घेतली तर खूप लालित्यपूर्णही आहे. नचिकेत्याची देहाला सुख देणार्या वस्तूंविषयीची निस्पृहता, नाराजी पाहून यम प्रसन्न होऊन म्हणतो —
स त्वं प्रियान् प्रियरुपान् च कामान् अभिध्यायन् नचिकेतः अत्यस्राक्षी |
न एतान् सृंकाम् वित्तमयीम् अवाप्तो यस्यां मज्जन्ति बहवो मनुष्याः ॥
मुद्दामच शब्दांची फोड करून हा श्लोक दिलाय. कारण ज्यांना खरोखर वाचन- मनन- चिंतन करून आपलं जीवन आजच्या नि पुढच्या काळात सुधारायचं आहे त्यांना अभ्यासासाठी आणि त्यांच्या जीवनातील उपयोजनासाठी, प्रयोगासाठी याचा उपयोग व्हावा.
याचा सरळ अर्थ आहे – हे नचिकेता! (सर्वसामान्य, सुखलोलूप माणसात) तू (इतका निस्पृह, निरीच्छ आहेस की प्रिय असणार्या या जगातील नि परलोकातील सर्व भोगांचा योग्य प्रकारे विचार करून त्यांचा त्याग केलास (अभिध्यायन अत्यस्राक्षीः); या संपत्तिरूप (पैसा, जमीन, इतर भोगद्रव्यं इ.) बेडीचा (वित्तमीयम् सृंकाम्) त्याग केलास (तिच्या मोहात अडकला नाहीस) ज्याच्यात बहुसंख्य मनुष्य अडकून पडतात (गुंतून, गुंगून, रंगून जातात.)
या यमराजाच्या बोलण्यात अनेक शब्दप्रयोग खास विचार करण्यासारखे आहेत
* प्रियां च प्रियरुपान् कामान् ः- प्रिय वाटणारे, अत्यंत सुंदर रूप असलेले तसेच या नि परलोकातील सर्व भोगांना ज्यात अनेक वस्तू, पैसा, सुंदर स्त्रिया यांचा समावेश होतो, नाकारलं आहेस.
आजच्या काळाचा विचार केला तर अशा भोगवस्तूंचंच राज्य जगावर नि सर्व वयोगटांच्या बहुसंख्य व्यक्तींवर सुरू आहे.
* पैसा ः हे तर जणू परब्रह्म झालंय. पूर्वी ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः’ ऐवजी ‘दुडुर्ब्रह्मा दुडुर्विष्णुः’ असं विनोदानं म्हटलं जाई. दुडू म्हणजे पैसा. याचा अर्थ ब्रह्माविष्णुमहेशाइतकंच नव्हे तर साक्षात् परब्रह्म असलेला गुरुसुद्धा पैसाच झालेला आहे. आज असं कुणीही म्हणत नाही कारण त्यातला विनोद जाऊन ती एक वस्तुस्थिती बनलीय. सारेजण पैशासाठी वाटेल ते करायला नि विकायला तयार आहेत.
* उपभोगाच्या वस्तू ः सुंदर दिसण्यासाठी अक्षरशः अनंत प्रसाधनं (कॉस्मेटिक्स), स्त्रीपुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधन शृंगारघरं (ब्यूटी पार्लर्स), वस्त्रप्रावरणांचे म्हणजे कपड्यांचे असंख्य फॅशनेबल प्रकार; निरनिराळ्या जाहिराती करून विकले जाणारे लक्षावधी भ्रमणध्वनी संच (मोबाइल्स); खाण्यापिण्याचे विविध देशातील चित्रविचित्र चवी असलेले असंख्य पदार्थ; निरनिराळ्या आकर्षक आकाराची (डिझाइन्स) वाहनं, सर्वांत मुख्य म्हणजे अशा उपभोग्य वस्तूंची, साधनांची बाजारात असलेली रेलचेल, निरनिराळ्या भव्य दुकानातील (मॉल्स) आकर्षक मांडणी नि विक्रीच्या आक्रमक पद्धती हा सारा आपला आजचा जिवंत अनुभव.
त्याकाळी उपलब्ध असलेल्या अशा सार्या वस्तू यमराजानं भरपूर प्रमाणात नचिकेत्याला देऊ केल्या. पण नचिकेता बधला नाही, अविचल राहिला.
* आकर्षक नि प्रिय व्यक्ती ः मित्र, मैत्री या शब्दांना फ्रेंड- फ्रेंडशिप यासारखे शब्द वापरणं हा त्या संस्कृत नि सुसंस्कृत शब्दांचा अवमान आहे. बॉयफ्रेंड- गर्लफ्रेंड याला आपल्या भाषेत अचूक शब्द सापडणं अवघड आहे. कारण यात नुसतं ‘भाषांतर’ करायचं नाहीये तर ‘भावांतर’ करायचंय. हे इंग्रजी शब्दही पूर्ण उच्चारण्याऐवजी नुसतं बीएफ्- जीएफ् वापरणं अधिक पसंतीचं आहे. देहाच्या पातळीवरच्या अतिशय उथळ अशा संबंधाशी (नातं नाहीच!) जोडलेले काही इव्हेंट्स म्हणजे फ्रेंडशिप डे, फ्रेंडशिप बॉंड, व्हॅलेंटाइन डे … सर्व आत्मा हरवलेले कातडी नि मांस यांच्याशी संबंधित असलेले हे प्रकार!
आद्यशंकराचार्यांनी ‘भजगोविंदम्’ या हृदयस्पर्शी नि मस्तकदंशी स्तोत्रात यासंदर्भात काढलेले उद्गार आजच्या काळाला सुसंगत आहेत पण हे शब्द केवळ अरण्यरुदन ठरणार आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे अरण्यात रडणार्या व्यक्तीचं रडणं कुणालाही ऐकू जाण्याची शक्यता नसते त्याचप्रमाणे इअरफोन्स, ब्लूटुथ घातलेल्या तरुण कानात त्यांच्याच हिताचे शब्द घुसण्याची शक्यताही कमीच. काय म्हटलंय शंकराचार्यांनी?
तुम्हाला परस्परांच्या शरीराचे जे अवयव आवडतात ते म्हणजे- ‘एतन् मांसवसादि विकारम्’ म्हणजे शरीरातील मांस, स्नायू, शिरा यांचे बनलेले आकारच असतात अन् म्हणूनच ‘मनसि विचारय वारंवारम्’- मनात वारंवार, पुनःपुन्हा याचा विचार कर.
इतक्या लहान वयातही भावी जीवनातील आकर्षणं, प्रलोभनं, देहभोगाची साधनं यावर नचिकेत्याचा विचार पक्का नि निर्णय निश्चित झालाय. जसा आद्य शंकराचार्य, स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महापुरुषांचा झाला होता.
हे इतकं विस्तारानं सांगायचं एकच कारण म्हणजे या कटू सत्यस्थितीचा नि यातून निर्माण होणार्या, नव्हे होत असलेल्या अपराधांचा; अंतिम, टोकाच्या निर्णयांचा नि आत्मघातासारख्या कृतींचा योग्य विचार करून वेळीच सर्वांनी सावध व्हावं. पण याच्या पोटात एक दैवदुर्विलास दडलेला आहे, तो म्हणजे ज्यांना खरी गरज आहे ते वाचणार नाहीत, इतकंच काय वाचून परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करु शकणारे (पालक, शिक्षक यांच्यासारखेही) वाचणार नाहीत, वाचलं तरी विचार करणार नाहीत आणि विचार केला तरी त्याप्रमाणे आचार करुन इतरांसमोर आदर्श उभे करणार नाहीत. असो.
* अभिध्यायन् अत्यस्राक्षी ः हाही महत्त्वपूर्ण शब्दप्रयोग आहे. समजायला सोपा नाहीये पण सोप्या शब्दात सांगितला तर याचा अर्थ खूपच महत्त्वाचा आहे. ‘अभिध्यायन्’ म्हणजे सर्व बाजूंनी, नीट, सखोल विचार करून ‘अत्यस्राक्षीः’ म्हणजे वर सांगितलेल्या केवळ देहाच्या पातळीवर सुख (तेही तात्कालिक, क्षणभंगूर) – देणार्या वस्तूंचा, व्यक्तींचा विशिष्ट मर्यादेत भोग घेणं. हल्ली या दोन्ही गोष्टी आकाशकुसुमासारख्या (स्कायलोटस्) दुर्मिळ झाल्याहेत. कोणीही वाचायला, विचार करायला तयार नाही. पटलं तरी स्वीकारायला, त्यानुसार वागायला तयार नाही. ‘उपभोगाची’ दुनिया, भोगांचा जमाना बनलाय. स्वतःच्या मुलाचं तारुण्य उसनं घेऊन ‘अभी तो मैं जवान हूँ’ म्हणत जीवन ओरबाडून उपभोग घेणारा ययाती आजच्या समाजाचा आदर्श पुरुष (रोल मॉडेल्) बनलाय. हे सारे भोग आकंठच नव्हेत तर नाकातोंडात गेल्यामुळे गटांगळ्या खाऊन ‘आता पुरे, बस्’ हा अनुभव आलेल्या ययातीनं सार्या मानवजातीला सर्वकालासाठी उपयुक्त असा दिलेला संदेशही कुणी विचारात घेत नाही.
कोणता बरं होता हा संदेश?
न जातु कामःकामानां उपभोगेन शाम्यति |
हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाऽभिवर्धते ॥
अर्थ सोपा आहे- आपल्या कामना, वासना कितीही पूर्ण करण्याचा, तृप्त करण्याचा प्रयत्न केला तरी त्या कधीही तृप्त, शांत होत नाहीत. यासाठी दृष्टांत दिलाय तोही किती बोलका आहे. पेटलेल्या अग्नीला त्याला हवंय तितकं इंधन देत राहिलो तर तो कधीतरी विझेल का? या ‘अग्निशमना’साठी कोणत्या फायर ब्रिगेडचा उपयोग होणार आहे?
या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. ‘आज ये दिल मॉंगे मोअर्’, ‘प्यास बढाओ’, ‘काय करु कितीही खाल्लं, पिलं, वापरलं, पाहिलं तरी समाधान होत नाही- होणार नाही’ अशा घोषणा देणार्या जाहिराती हे या भयंकर परिस्थितीचं बोलकं उदाहरण आहे.
हे सांगण्यात सध्या जी जीवनशैली स्वीकारलीय त्या सुवापिढीलाच नव्हे तर ‘सेकंड इनिंग’ उत्साहानं सुरू केलेल्या ज्येष्ठ, निवृत्त नागरिकांनाही सावध करण्याचा हेतू आहे. यामागचा उद्देश नकारात्मक, निराशाजनक निश्चित नाहीये. कठोपनिषदाचाही नव्हता.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या काळीही देहसुखाच्या मागे धावणार्यांची, त्यासाठी (वाटेल त्या मार्गानं) अधिकाधिक पैसा मिळवण्याची धडपड करणार्यांची संख्या बर्यापैकी होती. खुद्द नचिकेताचे पिताश्री विश्वजित् यज्ञ करणारे वाजश्रवस् ऋषीही या लालसेतून, लालचीपणातून सुटलेले नव्हते. ते दान देत असलेल्या भाकड गायींकडे पाहून बालक नचिकेताच्या मनात मात्र यात काहीतरी चुकतंय असा विचार तीव्रतेनं आला. ‘मला तुम्ही कुणाला दान करणार?’ हा अतिशय मार्मिक प्रश्न त्यानं वडिलांना पुनःपुन्हा विचारले. रागाच्या भरात त्यांनी नचिकेताला म्हटलं, ‘जा, मी तुला यमाला दान केलं.’ हे पित्याचे शब्द, जे यज्ञाच्या अग्नीच्या साक्षीनं अनेकांच्या उपस्थितीत काढले गेले होते, खरे करण्यासाठी मोठ्या निर्धारानं यमाच्या राज्यात आला होता. ऋषींना सुचलेली ही कल्पनाच किती हृद्य आहे! या कथेला एक आख्यायिका म्हणून स्वीकारूनही आचार्यांपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत सर्वांनी ती सर्व काळातील मानवांसाठी प्रेरक आणि मार्गदर्शक आहे याचा आग्रह धरला.
आपण हे उपनिषद नीट वाचून, विचार करून मनःशांती, मनःप्रसाद मिळवण्याचा प्रयत्न करु या. विवेकानंदांना हवे असलेल्या शंभर नचिकेतांपैकी एक नचिकेता बनण्याचा संकल्प करु या. निदान प्रयत्न तरी…